आनंदनगरतांडा येथे महिला सरपंच व पतीस सदस्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 04:45 PM2019-01-27T16:45:16+5:302019-01-27T16:45:51+5:30
सदस्यानेही दिली मारहाणीची तक्रार
निपाणे, ता. एरंडोल : आनंदनगरतांडा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सरपंच वंदना भास्कर राठोड व त्यांचे पती भास्कर देवसिंग राठोड यांना ग्रामपंचायत सदस्य मांगू दासू राठोड व त्यांचा भाऊ खेमराज राठोड यांनी मारहाण केल्याची तक्रार भास्कर राठोड यांनी केली आहे. या प्रकरणी मांगू दासू राठोड यांनीही तक्रार देऊन आपल्यास सरपंच व त्यांच्या पतीने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
सरपंच वंदना राठोड यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून मांगू राठोड यांनी महिला सरपंच वंदना राठोड व मला मारहाण केली असे सरपंचचे पती भास्कर राठोड यांचे म्हणणे आहे. तर ग्रामपंचायत सदस्य मांगू राठोड यांनी सांगितले की, ग्रामसभा घेण्याविषयी सांगितले म्हणून मला व माझा भाऊ खेमराज राठोड यांना सरपंचासह त्यांच्या पतीने मारहाण केली.
याबाबत दोघांनी कासोदा पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दिली असून त्याची नोंद करण्यात आली आहे.