जळगाव तालुक्यातील आसोद्याच्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:58 PM2018-07-25T12:58:17+5:302018-07-25T12:59:02+5:30
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे नूरजहा असलम पिंजारी (वय-२१) या विवाहित महिलेने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९़३० वाजता उघडकीस आली़ जिल्हा रूग्णालयात दुपारी प्रचंड गर्दी झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दीड वर्षापूर्वी नूरजहा यांचे असलम यांच्याशी विवाह झाले़ त्यांना सात महिन्याचा एक मुलगा आहे़ असलम हे मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करायचे़ कामामुळे अनेक दिवस असलम हे बाहेर गावी राहत होते़ यात त्यांना दारूचे व्यसनही जडले़ मंगळवारी सकाळी नूरजहा ह्या पती असलम यांच्याशी फोनवर बोलत होत्या़ त्यानंतर घराच्या आतल्या खोलीत जाऊन त्यांनी अचानक ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला़ हा प्रकार कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित नागरिकांच्या मदतीने नूरजहा यांना खाली उतरविले आणि जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती नुरजहा यांना मृत घोषित केले़ घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते़
नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी देखील जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली़ कुटूंबीयांनी मृत्यूची बातमी एकताच हंबरडा फोडला़ पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले़ दरम्यान, कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही़ मात्र, कौटुंबीक वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे़ नुरजहा यांचे माहेर भुसावळ येथील आहे़ दरम्यान, वरणगाव येथील आजी-आजोबांकडे त्यांचे संगोपन झाले़