खानापूर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:14 PM2018-07-10T13:14:55+5:302018-07-10T13:15:40+5:30
राहत्या घरात छताला दोरी बांधून संपविली जीवनयात्रा
रावेर , जि. जळगाव : रावेर तालुक्यातील खानापूर येथील अविवाहित शेतमजूर युवक चेतन एकनाथ जाधव (राजपूत) (वय २६) याने सोमवारी रात्री घरात एकटा झोपला असताना गळफास घेऊन आत्महत्याकेली. मंगळवारी पहाटे ही घटना उघड झाली. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खानापूर येथील शेतमजुरी करणारा अविवाहित तरुण चेतन जाधव हा रात्री राहत्या घरात एकटा झोपला असताना त्याने घराच्या दरवाजाची कडी आतून लावून बंद घरातील छताच्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे त्याची आई व वहिनीने शेतात लवकर जाण्यासाठी स्वयंपाक केला. चेतन न उठल्याने त्यास दरवाजा ठोकून आवाज देत उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचा मोठा भाऊ कैलास व शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता छताच्या कडीला दोरीच्या साह्याने चेतन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
मयताचे काका लक्ष्मण रूपसिंग जाधव यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले.