रेल्वेखाली झोकून देत तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:21 PM2019-06-06T12:21:19+5:302019-06-06T12:21:41+5:30
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
जळगाव : धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत शिवकॉलनीतील प्रेमसिंग रंगलाल चव्हाण (३९) या तरूणाने आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वे गेटनजीक बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली़
प्रेमसिंग हे शिवकॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते़ रखवालदारीसह व एका हॉटेलात वेटरचे काम करून ते घरचा उदरनिर्वाह करायचे़ बुधवारी दुपारी त्यांनी असोदा रेल्वेगेटजवळील खांबा क्रमांक ४२१/८-१० अपलाईनवर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली़ याबाबत स्टेशन प्रबंधक आऱ के़ वालेचा यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली़ सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पवार व पोलीस कर्मचारी धनंजय येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली़ अंगझडती घेतली असता पँटच्या खिशात पॅनकार्ड, वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक असलेले काही कागद सापडले़ त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.