जळगावात मित्राच्या लग्नासाठी नंदुरबारहून आलेल्या तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:00 PM2018-12-16T12:00:01+5:302018-12-16T12:00:21+5:30
नातेवाईकांना घातपाताचा संशय
जळगाव : मित्राच्या लग्नासाठी नंदुरबार येथून जळगावात आलेल्या दीपक भरत गावंडे (वय २६, मुळ रा. करमाड, ता.जामनेर, ह. मु. नंदुरबार) या तरुणाने हरिविठ्ठल नगरातील स्वत:च्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, दीपक हा आत्महत्या करणार नाही, हा घातपात आहे, असा संशय दीपक याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
झोक्याच्या दोरीने आवळला फास; इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याच्या घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली नव्हती. झोक्याच्या दोरीने फास आवळलेला असल्याने त्याची ही आत्महत्या नाही. हा घातपात आहे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरटीओंच्या वाहनावर होता चालक
दीपक हा आरटीओ निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसापूर्वीच त्याने काम सोडले होते. नंदुरबार येथे महावितरण कंपनीत कंत्राटी पध्दतीने कार लावून तेथेच स्थायिक होणार होता. त्यासाठी त्याने शुक्रवारी शहरात जुन्या ४ कार बघितल्या. चालक असल्याने स्वत:ची कार घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. आईचा आक्रोश मन हेलावणारा
दीपक याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आई, वडील व भाऊ दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात पोहचले. यावेळी आई आशाबाई यांनी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.
मित्राच्या लग्नासाठी वाटप केल्या पत्रिका
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक याचा मित्र नवल याचे १८ डिसेंबर रोजी जळगावात लग्न आहे. त्यासाठी तो तीन दिवसापासून जळगावात आला होता. हरिविठ्ठल नगरात त्याचे स्वत:चे घर आहे. त्या घरात तो रहात होता.
मोठा भाऊ नीलेश हा नंदुरबार येथे शिक्षक असल्याने पूर्ण कुटुंब नंदुरबारला स्थायिक झाले आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत मित्र नवल व दीपक या दोघांनी लग्नपत्रिकांचे वाटप केले. शनिवारी सकाळी शेजारचा मुलगा दीपक याच्याकडे घरी पाण्याचा पंप घ्यायला गेला असता त्याला दीपक गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक कांचन काळे, हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील, वासुदेव मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी दीपक याला मृत घोषीत केले.
यंदा लग्नाचे नियोजन
दीपक हा अविवाहित होता. यंदा लग्न करण्याचे नियोजन कुटुंबाने केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात मित्रांचा मोठा गोतावळा होता. वडील भरत देवराम गावंडे, आई आशाबाई व भाऊ निलेश हे नंदुरबारला स्थायिक झाले आहेत. करमाड, ता.जामनेर हे त्याचे मुळ गाव आहे. अनेक वर्षापासून ते जळगावातच स्थायिक होते. भाऊ निलेशच्या नोकरीच्या निमित्ताने कुटुंब आता नंदुरबारला स्थायिक झाले.