निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:27 AM2018-11-03T00:27:50+5:302018-11-03T00:28:14+5:30
रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.
रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे.
दत्तात्रय राघो पाटील यांच्या विवरे बुद्रूक शिवारातील शेत (गट नं.५८९) वर निंबोल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा चार लाख रूपयांचा बोझा आहे. त्यापैकी सव्वा लाख रूपये कर्ज थकीत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीत उत्पन्नाची आशा नाही. यामुळे त्यांनी गुरुवारी रात्री नांदुरखेडा शिवारातील पंडित घनश्याम पाटील यांच्या शेतातील सुन्या विहिरीत उडी घेतल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न झाल्याने व त्या पाठोपाठ यंदा दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत उत्पन्नाच्या आशा फोल ठरल्या आहेत. शेतकरी दत्तात्रय पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे दुष्काळाच्या भीषण परिस्थितीतच आत्महत्या केल्याने शेतकरी कुटुंंबातील दिवाळी अंध:कारमय झाली आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली, सून व नातवंडे आहेत. यासंबंधी राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार शरीफ तडवी करीत आहेत.
विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सव्वा लाख रुपये कर्ज थकीत होते
यंदा दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्नाची आशा मावळली