जि.प.च्या निलंबित लिपिकाची नैराश्यातून रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:51 PM2018-10-06T12:51:38+5:302018-10-06T12:52:39+5:30
अधिकाऱ्यांवर नातेवाईकांचा आरोप
जळगाव : रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यालगत मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून पुष्पकांत भागवत पाटील (४०, रा. खोटेनगर) असे मयताचे नाव आहे. जामनेर पंचायत समितीमध्ये लिपीक असलेल्या पाटील यांनी अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती, त्या वेळी नातेवाईकांनी जामनेरच्या गटविकास अधिकाºयांसह जि.प.मधील अधिकाºयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, पुष्पकांत पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कामाला होते. चार महिन्यांपूर्वी त्यांची जामनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात बदली झाली. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी वेळीवेळी मानसिक त्रास देणे व सायंकाळी उशीरापर्यंत कामावर थांबवून ठेवणे असा त्रास देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या सोबतच गटशिक्षणाधिकाºयांनी पुष्पकांत पाटील यांच्याकडून ५ हजार रुपये उसनवारीने घेतले होते. मात्र ते पैसे परत न देता त्यांना मानसिक त्रास देणे सुरू केला होता असाही आरोपी मयताची पत्नी सविता पाटील यांनी केला. काहीही कारण नसताना पाटील यांना गेल्या दोन महिन्यांपासून निलंबित केले होते. त्यामुळे नैराश्य येऊन गेल्या आठवड्यापासून ते एकाकी राहत होते. या नैराश्यातून गुरूवारी ४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. त्यानंतर रेल्वे मालधक्क्याजवळ पश्चिम रेल्व लाईनच्या खंबा क्रमांक ३०३ /३१-३३ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
पुष्पराज पाटील हे खोटे नगर येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित बहिणी, चार वर्षाची मंजिरी आणि दोन वर्षाची हिरा अशा दोन मुली आणि असा परिवार आहे.