यंदाचा उन्हाळा वृद्धांसाठी ठरतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 03:37 PM2019-06-15T15:37:00+5:302019-06-15T15:38:55+5:30
यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाने अक्षरश: कहरच केला आहे. ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेले तापमान वृद्धांसाठी कर्दनकाळच ठरले आहे. या उन्हाळ्यातील चार महिने अर्थात मार्च ते १५ जून या साडे तीन महिन्यातच पालिकेत झालेल्या मृत्यू नोंदणी वरून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे प्रमाण मागील वर्षी २०१८ मध्ये केवळ ५५ होते. त्यामुळे चार महिन्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा शंभरी पार करतो की काय याची भीती वाटू लागली आहे.
यंदाच्या उन्हाळ्याने अक्षरश: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नाकीनऊ आणले आहेत. दररोज ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस पार केलेल्या या असह्य तापमानाचा फटका सर्वाधिक सत्तरी पार केलेल्या वृद्धांना बसला आहे. या जीवघेण्या उन्हामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे.
गेल्या वर्षभरात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्यूचे प्रमाण १९७ ते त्यात १०६ पुरुष व ९१ स्त्रियांचा समावेश होता, तर या वर्षीच्या जानेवारी १९ ते १५ जूनपर्यंत हा आकडा ११९ पर्यंत पोहोचलेला आहे. ज्यात पुरुष ५९ तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ६० असे आहे
मागील वर्षी उन्हाळ्यात मार्च ते जून या चार महिन्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ५५ होती, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च ते १४ जून या साडे तीन महिन्यातच ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एप्रिल आणि जूनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. अद्याप जून महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे संकेत दिसत नाहीत. दररोज पालिकेत दोन चार जणांच्या मृत्यूची नोंद होत असल्याने चार महिन्यातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शंभरी पार करते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात वृद्धांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, हाता-पायाला मुंग्या येणे व त्याचा परिणाम किडनीवर होऊन किडनीचे कार्य मंदावते व त्यामुळेच मृत्यूला सामोरे जावे लागते. त्याकरिता उन्हाळ्यात शक्यतोवर वृद्धांनी व मधुमेहाच्या रुग्णांनी बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे व नियमित तपासण्या कराव्यात.
-डॉ.अमितकुमार हिवराळे, फैजपूर