जळगावात उन्हाची तीव्रता कायम, उष्माघाताचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:29 PM2019-04-30T12:29:49+5:302019-04-30T12:30:34+5:30
रात्री ८ पर्यंत तापमानाचा पारा राहतोय ४० अंशापर्यंत
जळगाव : महिनाभरापासून प्रचंड तापमानाने जळगावकरांना हैराण करून सोडले असून मंगळवारीदेखील उन्हाच्या तीव्रतेने शहरवासीय घामोघाम होत आहे. सोमवारी देखील पारा ४६ अंशावर स्थिर होता. यंदाच्या एप्रिल महिन्याच्या तापमानाने गेल्या ९ वर्षाचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून रात्री आठ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर राहत आहे. अजून दोन दिवस अशीच स्थिती राहणार आहे
एप्रिल महिन्यात शहराचे कमाल तापमान ४० ते ४१ अंश इतके असते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याची सरासरी ही ४२ अंशापर्यंत गेली होती. तर यावर्षी मात्र, एप्रिल महिन्याचा सरासरीत १ अंशाची वाढ झाली आहे. ४२ ते ४३ अंशावर स्थिर राहिल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे १४ ते १७ एप्रिल दरम्यान शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. तरीही सरासरीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या सरासरी तापमानात तब्बल ३ ते ४ अंशाची वाढ झाली असून, भविष्याचा दृष्टीने हे धोकेदायक चित्र आहे.
आगामी आठ दिवस धोक्याचे
गेल्या आठवड्यात हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजात ५ मे पर्यंत तापमानात कोणतीही घट होण्याची शक्यता नाही. २९ रोजी देखील शहरात उष्णतेची लाट कायम राहणार असून, जळगावकरांनी काम असेल तरच बाहेर जावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.विशेष करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी उन्हाचा फटका बसणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. एप्रिल इतका भयंकर तर मे महिना कसा असेल ? हा विचार करतानाच जळगावकरांच्या पोटात भितीचा गोळा उभा राहत आहे. ५ मे नंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून तापमानात काही घट होण्याची शक्यता आहे.
रात्रीचा पारा ३० अंशावर
सकाळी ८ वाजेपासून तापमान वाढण्याची गती सुरु होत असून रात्री ८ वाजेपर्यंत तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहत असल्याने उष्ण झळा या कायम असतात. यावर्षी उन्हाळ्याप्रमाणे हिवाळा देखील कडक होता. हिवाळ्यात जळगावचा दिवसाचा पारा २५ ते २६ अंशावर होता. उन्हाळ्यात मात्र रात्रीच्यावेळेस २८ ते ३० अंश सेल्सीअस तापमान राहत असल्याने रात्री देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. रात्री ११ वाजेपर्यंत पारा ३५ अंशावर राहत आहे.
आर्द्रतेमध्ये मोठी घट
तापमानात वाढ होण्याचे मुख्य उष्ण व कोरड्या वाऱ्यांचा परिणाम हे आहे. शहराच्या आर्द्रतेच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
तापमानाची वेगवेगळी नोंद
सोमवारच्या तापमानाबाबत वेगवेगळी नोंद करण्यात आली असून, भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार सोमवारी ४५.४ अंशाची नोंद झाली. भुसावळ येथील वेलनेस सेंटरच्या अंदाजानुसार ४७ तर स्कायमेट या खासगी संकेतस्थळाच्या नोंदीनुसार ४६ अंशाची नोंद करण्यात आली आहे. राष्टÑीय महामार्ग लगत ४७ अंशाच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भासमान देखील ४८.३ इतके होते.