भर उन्हाळ्यात शिरसोलीची पाणपोई कोरडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:46+5:302021-05-28T04:13:46+5:30
शिरसोली : शिरसोली प्र.बो. येथील जळगांव पाचोरा रस्त्यावरील वाटसरुंची तहान भागविणारी पाणपोई भर उन्हाळ्यात कोरडी असल्याने वाटसरुंसह ...
शिरसोली : शिरसोली प्र.बो. येथील जळगांव पाचोरा रस्त्यावरील वाटसरुंची तहान भागविणारी पाणपोई भर उन्हाळ्यात कोरडी असल्याने वाटसरुंसह व्यापारी बांधवांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. येथील पाणपोई सुरू करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांसह वाटसरुंकडून केली जात आहे.
शिरसोली येथील जळगाव पाचोरा मुख्य रस्त्यावर वाटसरु व व्यापाऱ्यांची पाणी पिण्याची सोय व्हावी यासाठी एका संस्थेने स्व. मिलिंद उत्तमराव पाटील या नावाने पंधरा वर्षांपूर्वी एक पाण्याची टाकी बांधून दिली आहे. या टाकीवर रस्त्याने ये जा करणारे अनेक प्रवासी ( वाटसरु) , तसेच विवेकानंद ,वि.दा. सावरकर,संत रुपलाल महाराज ,महात्मा जोतिराव फुले व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांसह आजूबाजूचे रहिवासी येथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचा वापर करीत असतात. या टाकीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हाॅटेल व्यावसायिक आहेत. त्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. उन्हाळ्यात पाण्याची अत्यंत गरज असताना, पाणी मुबलक असले तरी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे येथील पाण्याच्या टाकीत बरेच दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही नसल्याने येथील व्यापारी व वाटसरुंचे पाण्यासाठी हाल होत आहेत.