म्हमद्याच्या म्हशीवर बसून नदी पार करताना गाठला कुलगुरू निवड समितीचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:55 AM2018-12-09T00:55:55+5:302018-12-09T00:57:02+5:30
रावेर , जि.जळगाव : सतत १६ वर्षे एकाच मालकाकडे प्रामाणिकपणे सालदारी करणारे वडील, उरल्या सुरल्या बाजारातील पिवळी वांगी आणणारी ...
रावेर, जि.जळगाव : सतत १६ वर्षे एकाच मालकाकडे प्रामाणिकपणे सालदारी करणारे वडील, उरल्या सुरल्या बाजारातील पिवळी वांगी आणणारी आई व आज तरी आई खायला पूर्ण भाकरी मिळेल का आई.. असा गौरविणारा थोरला भाऊ हेच माझे परमेश्वरापेक्षाही मोठे दैवत असल्याचे आदर्श मानणारे माजी कुलगुरू डॉ.प्रा.आर.एस. माळी यांनी बालपणी शालेय शिक्षण घेताना भोकरी येथील म्हमद्याच्या म्हशीवर बसून भोकर नदी पार करून रावेरला शालेय शिक्षण घेण्याची नौका पार पाडली, असे असले तरी निव्वळ कुलगुरू पदावर न थांबता विविध विद्यापीठांच्या कुलगुरू निवड समितीचा सदस्य म्हणून कुलगुरूंची शिफारस करण्याचा परमोच्च कळस गाठून तथा विद्यापीठात विद्यार्थीहित जोपासतांना शिक्षणशुल्क नियमन करीत संशोधन व शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अव्याहतपणे धडपडत असल्याचा प्रवास आपल्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडला.
रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे आयोजित सतराव्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. भवरलाल अँड कांताई मल्टिपर्पज फाऊंडेशनद्वारे हे व्याख्यान प्रायोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.प्रा.आर.एस.माळी, त्यांच्या सुविद्य पत्नी वसुंधरा माळी, विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, अध्यक्ष सचिन जाधव यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून केले.
पत्रकार दिलीप वैद्य यांनी ही प्रकट मुलाखत घेतली.
प्रा.डॉ.माळी पुढे म्हणाले, वयाच्या ७६व्या वर्षातही व्याख्यानातील रसिक श्रोते तथा शैक्षणिक चर्चासत्रातील शिक्षण व संशोधनाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांच्या चेहऱ्यावर तरळणारे हास्य आपल्यासाठी मोठे उर्जास्त्रोत आहे. विद्यार्थ्यांनी जगाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, भीती न बाळगता बोलते व्हावे. आत्मविश्वास वाढवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
रोममध्ये गेले तर रोमसारखे राहता आले पाहिजे, या गुरूजनांच्या शिकवणीतून घडल्याने पुण्यनगरीच्या ब्राह्मण बहूल क्षेत्रात माळी आडनाव घेऊन वावरताना कुठलीही अडचण आली नाही, असे सांगून ते केवळ भ्रामक गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाघोड येथील प्राथमिक शिक्षणात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिकतांना राघो शामा महाजन व शंकर रामचंद्र चौधरी यांनी १ रू ते ५ रू पर्यंत बक्षीस व त्यासोबत असलेले गांधीटोपीचा सन्मान पटकाविण्यासाठी शालेय शिक्षणात गुणवत्ता प्राप्त केल्याचा व त्यासाठी प्राथमिक शिक्षक रघुनाथ रावजी पाटील यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन निरंतर स्मरणात राहणारे ठरले. आईवडीलांसोबत शेतमजूरी करून, तामसवाडीच्या खदानीत खडी खोदून, प्रसंगी गुरं चारून नव्हे तर रस्त्यावर रस्ता कामगार म्हणून हातमजुरी करून रावेरला हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शालेय शिक्षण घेतल्याचे आठवणींना त्यांनी उजाळा दिला.रावेरच्या सरदार जी जी हायस्कुल मध्ये डी टी कुलकर्णी, व्ही बी दिक्षित, ना भि वानखेडे या गुरुजनांची अध्यापनपध्दत आजच्या शिक्षण व संशोधनाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी प्रेरक ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संस्कृतचे शिक्षक श्री व्यवहारे व चित्रकलेचे शिक्षक श्री डोहळे यांची सर्वस्व अर्पण करण्याच्या अध्यापन पध्दतीमुळे भालोद येथे झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत माज्या प्रभातफेरीच्या चित्राने प्रथम क्रमांक पटकावल्याच्या आठवणी त्यांनी जाग्या केल्या.
वाघोड येथील शंकर रामचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून बॅरिस्टर वाय एस महाजन यांचेशी संपर्क साधून हलाखीच्या परिस्थितीत पट्टयांचा नाईट पायजमा घालून जळगावला जावून बी एसस्सी केमिस्ट्री च्या प्रथम वर्षांचा प्रवेश घेतल्याचे सांगून माळी बोर्डींग मध्ये ५४० रू त पहिले वर्ष घालवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे विद्यापीठात आर्थिक परिस्थिती नसल्याने एक वर्ष माध्यमिक शिक्षकाची नोकरी करण्यासाठी तळोदा, साक्री व भुसावळ येथे अर्ज केले. भुसावळचे स्वामी विवेकानंद विद्यालयात निवड करून रूजू झाले.मात्र रसायनशास्त्राचे प्रा नाडकर्णी यांनी हायस्कूल ऐवजी कॉलेजचा शिक्षक हो असे सांगून त्यांनी राजीनामा देवून व्याख्याता म्हणून एम जे ला नियुक्ती करून दिल्याचे गुरूप्रेम विषद केले.
खान्देशात एम एस स्सी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी यावे लागत होते.त्यामुळे खान्देशातील महाविद्यालयात शिक्षणाचा व संशोधनाचा
गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू बनण्यासाठी प्राधान्यक्रम दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोणताही महाविद्यालयीन विद्यार्थी आर्थिक साहाय्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठात १ कोटी १० लाख रू बचतठेव ठेवून एकलव्य विद्याधन योजना राबवून गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून दिल्याचे सांगून बँकेचे शैक्षणिक कजार्चे व्याज विद्यापीठाकडून अदा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुणवत्ता वाढीसाठी पदवीदान समारंभात आवाहन केले असता २००३ मध्ये २६ जणांनी सुवर्णपदकासाठी देणगी दिली.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अभियांत्रिकीच्या सुवर्णपदकासाठी २ लाख रू अदा करून तर सन २००६ मध्ये भवरलाल जैन यांना डी लीट पदवी प्रदान केली असता त्यांच्या योगदानातून ५१ सुवर्णपदके प्रदान करण्याचा पायंडा घालून विद्यालयाच्या गुणवत्तेसाठी आदर्श महाविद्यालय, प्राचार्य व प्राध्यापक असे पुरस्कार निर्माण करून प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड विद्यापीठ २ स्टार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ५१ लाख रू दिले होते. मात्र आपले विद्यापीठ ४ स्टार असतांनाही अनुदान नसल्याचे ध्यानात आणून दिले असता ३.५ कोटी रू अनुदान व विद्यापीठात पदे वाढवून मंजूर आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोगस प्राध्यापक कुठले प्राध्यापक घडवणार या उद्देशाने सात बोगस पीएच.डी धारकांवर व कामचुकार तथा बेशिस्त ८ कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करून शिस्त बाणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नामदार गोपाळकृष्ण गोखले पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर गुणात्मक दर्जा उंचावण्याचे काम केल्याने प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिनियम समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असून प्राध्यापकांच्या नेमणूकांसाठी १५ ते ४० लाख देणगी लागू नये म्हणून शॉर्टलिस्टसाठी कोष्टक तयार करून व व्हिडिओ रेकॉर्डींग तयार करून कुलगुरूंकडे पाठवण्याचा व प्राध्यापकाच्या मान्यतेसाठी ३० दिवसाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा कायदा लवकरच अंमलात आणला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत ९०३ विद्यापीठात ३.५ लाख विद्यार्थी आहेत. १२ खासगी विद्यापीठात सुसूत्रता आणण्यासाठी समिती स्थापन केली असून त्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. प्रत्येक शिक्षकाने जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर गुणवत्ता उंचावण्याचे काम होते. सेमी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी घरचे वातावरण मराठी असते.म्हणून मातृभाषेतून शिक्षण घेतले तर स्पर्धेत टिकू शकाल असेही त्यांनी स्पष्ट केले. मातृभाषा असली तरी काही अडचणी येत नाही. मराठीत विचार करून इंग्रजीत व्यक्त करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.
पालकांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाण्याची ओढ असते. महाविद्यालयाची संख्या वाढली विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. अभियांत्रिकीच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापकांना जोखडले जाते. म्हणून विद्यार्थ्यांची कुवत बघा.आता विज्ञान पदवीधरांना अभियंता पेक्षा जास्त पॅकेज असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.
आभार विठोबा पाटील यांनी मानले.