संडे स्पेशल मुलाखत - सातत्यपूर्ण सामाजिक कार्यातून ‘वॉटर हिरो’ नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:32 AM2020-09-13T00:32:23+5:302020-09-13T00:33:34+5:30
युवकांना दिशा देऊन युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी उपयोग केल्यास व्यापक स्वरूपात सामाजिक क्रांती घडू शकते -रणजितसिंग राजपूत
वासेफ पटेल
भुसावळ : युवकांना दिशा देऊन युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी उपयोग केल्यास व्यापक स्वरूपात सामाजिक क्रांती घडू शकते, असे केंद्र शासनातर्फे ‘वॉटर हिरो’ म्हणून नामांकन झालेले रणजितसिंह संजयसिंह राजपूत यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
खडका, किन्ही भागात दगड, मातीचे बांध बांधून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविले. या कार्यासाठी त्यांनी तीन महिने परिश्रम घेतले. यात सुमारे दहा लाख लीटर जलसाठा झाला. या नाल्याचे नदीत रुपांतर केले. चोरवड गावाजवळील हा प्रकल्प यशस्वी ठरला. याची दखल घेत जलशक्ती मंत्रालयाने रणजितसिंग राजपूत यांना ‘वॉटर हिरो’ने सन्मानित केले.
प्रश्न : दुष्काळ जाणीव कशी झाली?
२०१६ साली पडलेला दुष्काळ आणि त्या वर्षी लातूर येथे रेल्वेने पाठविण्यात आलेले पाणी हा संघर्ष बघून आपल्या शहरावरसुद्धा ही परिस्थिती येऊ शकते. यासाठी श्रमदानातून जलसंधारण उपक्रम राबविला. त्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या राळेगणसिद्धी येथे प्रत्यक्ष भेट देऊन अण्णांच्या कार्याची माहिती घेत तिथला आदर्श घेऊन खडका, किन्ही भागात दगड मातीचे बांध बांधायला सुरवात केली. त्यावेळी सोशल मीडियावर पाण्याचे संकटावर पर्याय म्हणून जलदूत नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांमध्ये जनजागृती करीत भर उन्हाळ्यात दर शनिवारी व रविवारी सकाळी शहरातील तरुणाई गावात जाऊन हातात कुदळ, फावडे घेऊन काम करायला लागली आणि कामाला सुरवात झाली.
प्रश्न : सामाजिक कार्यात कसे वळलात?
परिवारात आई-वडिलांचे संस्कार व मनामध्ये आपण कुणाचे काही देणं लागतो ही भावना असल्याने शाळेत असतानादेखील हरित सेना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना ह्यामुळे सामाजिक कार्याबद्दल आवड निर्माण होत गेली. कुठल्याही प्रकारचे स्वार्थ मनी न बाळगता सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करायला लागलो. मी करीत असलेल्या कार्याला घरच्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नव्हता. उलट त्यांचे मार्गदर्शन मला नेहमी मिळाले आणि तेच मार्गदर्शन मला प्रेरणास्रोत ठरले.
प्रश्न : नंतर पुढे काय केले?
भुसावळ शहरात आपण कृतिशील सामाजिक संस्था उघडावी; जेणेकरून अधिक कार्य आपण त्या माध्यमातून करू शकतो. यासाठी १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मजयंती दिनी भुसावळ शहरात जी संस्था प्रत्यक्ष कृतीला महत्व देईल या हेतूने संस्था व कृती याला समाविष्ट करून संस्कृती फाउंडेशन नावाने संस्थेची स्थापना केली आणि कृतीशिक उपक्रमांना सुरवात केली. आमचे अधिक कार्य हे निसर्गसेवेशी समर्पित आहे. निसर्ग आपल्याला सर्व काही देतो आणि आपणही याचे काही देणं लागतो या भावनेतून निसर्ग हा आमच्या कार्याचा मूळ उद्देश आहे.
प्रश्न : भुसावळ शहरात स्वच्छतादूत म्हणून कार्य?
२०१७ मध्ये भुसावळ शहराला संपूर्ण भारतात अस्वच्छ शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले त्यावेळी आपण करीत असलेल्या स्वच्छता जनजागृती कार्याबद्दल माजी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना कल्पना असल्याने त्यांनी शहरातील स्वच्छतेची सूत्रे माझ्या हाती सोपविली आणि ही माझ्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी होती. जेणेकरून माझ्या शहराचे नाव मला स्वच्छतेच्या यादीत कसे आणता येईल यासाठी मी व माझ्यासोबत मी नेमलेले स्वच्छता मित्र कार्यशील होते. आम्ही सुरवातीला प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जावून पथनाट्ये केली. प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. जनजागृतीपर वक्तृत्व, चित्रकला, निबंध अशा स्पर्धा घेतल्या आणि भुसावळ शहरातील संपूर्ण अस्वच्छ असलेल्या भिंतीना साफ करून त्यावर स्वच्छता जनजागृतीपर चित्रे काढली. संपूर्ण भुसावळ शहरातील भिंती बोलक्या केल्या. ह्या केलेल्या व्यापक स्वरूपातील कार्यामुुळे भुसावळ शहर २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात ‘द फास्टेड मूव्हर सिटी’ स्वच्छता जलद गतीने प्रगती करणारे शहर म्हणून नामांकित झाले. येथे माझी व माझ्यासोबत कार्य करीत असलेल्या संपूर्ण युवकांची भुसावळकरांना खरी ओळख झाली.
समस्यांवर चर्चा न करता मार्ग शोधा
भुसावळ शहरात पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून आपण या समस्येवर समाधान मिळवू शकतो. २०१६ मध्ये केलेले जलसंधारण क्षेत्रातील कार्य यशस्वी ठरल्यामुळे गेल्या वर्षी त्याला व्यापक स्वरूप देण्याचे आम्ही ठरविले आणि जलप्रेमी युवकांच्या मदतीने चोरवडच्या नाल्याला नदीत रूपांतर करण्याचे ठरविले, ही आमच्यासाठी एक कठीण गोष्ट होती. परंतु युवाशक्तीने जर का ठरविले तर प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढू शकतो आणि हेच बघता आमच्या हाताने आम्ही कार्य सुरू केले आणि हे सोशल मीडियावर बघता परिसरातील काही दात्यांनी मदत स्वरूपात यंत्र सामग्री उपलब्ध करून दिल्याने आज याच ओसाड अवस्थेत पडून असलेल्या नाल्याचे दुतर्फा भरून वाहणाºया नदीत रूपांतर केले आणि आज याच कार्याचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांच्या वतीने दखल घेण्यात आली.
युवकांना संदेश काय देणार?
आपल्या कार्यशक्तीचा विधायक वापर करून आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून पुढाकार घेत समाजसेवेत पुढे आले पाहिजे.
‘वॉटर हिरो’ नामांकन
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जलसंधारण क्षेत्रात मिळालेले यशाचे खरे हकदार माझ्याबरोबर कार्य करणारे जलदुतांचे आहे. त्यामुळे हे यश माझे एकट्याचे नसून, जलसंधारण श्रेत्रात माझ्यासोबत कार्य केलेल्या त्या प्रत्येक युवकांचे आहे, असे मी समजतो.