संडे स्पेशल मुलाखत- कीर्तन सेवा हे समाज सेवेचे प्रभावी माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:02 PM2020-10-03T23:02:08+5:302020-10-03T23:03:20+5:30
ज्याप्रमाणे दिवा हा पणतीशिवाय अर्थहीन आहे. त्याचप्रमाणे कन्येशिवाय ही सृष्टीदेखील अपूर्ण आहे, असे मला वाटते. - दुर्गाताई संतोष मराठे
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : कीर्तन सेवा हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षा दुर्गाताई संतोष मराठे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कीर्तन सेवेला समाजसेवेचे प्रभावी माध्यम म्हणून अध्यात्म, संत परंपरा, आदिशक्ती मुक्ताईचे महात्म्य, स्त्री मुक्ती, भ्रूणहत्या, स्त्री शिक्षण, हुंडाबळी, बालसंस्कार आणि कुपोषण यासारख्या विविध सामाजिक विषयांवर प्रभावीपणे समाज प्रबोधन करून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या कीर्तनकार म्हणून दुर्गाताई मराठे यांच्याकडे पाहिले जाते.
प्रश्न- कीर्तनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असताना या क्षेत्रात आपण वळल्या कशा?
उत्तर- बालपणापासूनच घरात आई हरिपाठ म्हणायची. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग आई म्हणायची व भागवत कथा ऐकायलासुद्धा जायची. त्यावेळी गुरुवर्य तुळशीरामबाबा वानखेडे यांच्या विचारांनी प्रभावित होत एकनाथी भागवत ऐकत असताना ही प्रेरणा मिळाली. एवढेच नव्हे तर त्या काळातील दोन महिला कीर्तनकार हभप गोदावरीताई बंड, आणि हभप घाटेताई यांच्या कीर्तन शैलीतून मला वेगळी अनुभूती मिळाली आणि
‘विषयाचे बळ तुका म्हणे तेची फळं!’
या उक्तीनुसार मला कीर्तन करण्याचे बळ मिळाले. असे म्हणतात पायाळू व्यक्तीला काजळी लावली तर धनाचा साठा मिळतो, तसाच कीर्तन रुपी काजळी जीवनाला लाभल्यानंतर जीवन परिपूर्ण होते म्हणून कीर्तन या क्षेत्राकडे मी वळले.
प्रश्न- कीर्तनाला सुरुवात कधी केली व तो अनुभव कसा होता?
उत्तर- माझे माहेर सुटाळा, ता.खामगाव, जि.बुलढाणा असून इयत्ता दहावीला शिकत असताना १९९९मध्ये वाडी, ता.खामगाव येथे हनुमान मंदिरात तुळशीराम बाबा यांनी सहज मला ज्ञानेश्वरी पारायण संपल्यानंतर दुर्गा तू कीर्तन करू शकते हे सांगितले आणि गोपाळकाल्याच्या दिवशी जवळपास २०० श्रोत्यांसमोर मला उभे केले. सुरुवातीला भीती वाटली पण जसजसे कीर्तन पुढे गेले आणि मी भक्तीत तल्लीन झाले
‘संतांचे पायी हा माझा विश्वास
सर्व भावे दास झालो त्यांचे!!’
हा पहिला अभंग घेत मी खºया अर्थाने कीर्तनाला सुरुवात केली.
प्रश्न- महिला कीर्तनकार म्हणून माहेरी व सासरी कधी अडचणी निर्माण झाल्या व आतापर्यंत केलेले कीर्तन किती?
उत्तर- माझ्या कीर्तनाचा आशयच सामाजिक असल्याने लग्नाआधी जवळपास दीड हजार कीर्तन केले आहेत. जीवनात आई-वडील हे प्रथम गुरू, शैक्षणिक गुरू हे द्वितीय आणि अध्यात्मिक गुरू हे तृतीय असतात. आई-वडील हे यांच्यामुळे आपली ओळख होते, तर शैक्षणिक गुरुमुळे अर्थाजन होते आणि भगवंतापर्यंत पोचवणारा गुरू म्हणजे अध्यात्मिक गुरू असतो. महिला कीर्तनकार म्हणून मला माहेरी कधी विरोध किंवा अडचण झाली नाही, किंबहुना लग्नानंतर तर माझे सासरे सुपडू भिकनराव मराठे व सासू चंद्रभागा सुपडू मराठे हे दोन्ही वारकरी संप्रदायाशी व अध्यात्माशी रूजलेले असल्याने आणि पती संतोष सुपडू मराठे हेदेखील अध्यात्म मार्गाने मार्गक्रमण करणारे असल्याने लग्नानंतरही दीड हजारावर कीर्तन केले आहेत. आदीशक्ती मुक्ताईने १४०० वर्षे तपश्चर्या केलेल्या संत चांगदेव महाराजांना देवबुद्धीचा मार्ग शिकविला म्हणून
‘चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो,
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा!
यावरून गुरू-शिष्य परंपरेची महतीदेखील कीर्तनातून दुर्गाताई मराठे या वर्णन करत असतात.
प्रश्न- कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक आशय दर्शवताना खरा संदेश काय द्याल?
उत्तर- शिक्षण ही काळाची गरज असून स्त्री शिक्षणातून भ्रूणहत्या थांबवून २० वर्षांपासून जननदर मुलींचा कमी होत आलेला आहे, ती कुप्रथा बंद झाली पाहिजे. मुलींची संख्या कमी झाल्यानेच पापाची वृत्ती वाढली असून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडत आहे. विद्यमान काळात कोरोनासारखा विषाणू येऊन महामारी का आली? असे आपण म्हणतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात,
‘तुका म्हणे पापे,येती रोगाची रूपे!’
हीच वस्तुस्थिती आहे. कोरोनासारख्या महामारीचा उल्लेख शिवपुराण यामध्ये आढळून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दर आठ पंधरा दिवसांनी येऊन स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग पाळण्यातसंदर्भात संदेश देत आहेत. हेच संदेश संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेत सांगण्यात आले आहे. मात्र असत्य वाढले, धर्म लोप पावला, वर्तणूक बदलली, हिंसा वाढले या सर्वांसाठी कीर्तन हे समाज प्रबोधनाचे खरे माध्यम ठरत आहे म्हणून त्या म्हणतात-
‘आता तरी पुढे हाचि उपदेश नका करू नाश आयुष्याचा!’
सरकारने जनजागृतीसाठी कीर्तन क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास सामाजिक विषय जगापर्यंत पोहोचवणे सोपे झाले असते. मुक्ताईनगर तालुक्यासारख्या ठिकाणी पुरुष व महिला कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे कीर्तन यू-ट्यूबसारख्या माध्यमात प्रसारित केल्यास ते एक प्रभावी प्रबोधन ठरेल आणि संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, असे मत दुर्गाताई मराठे यांनी व्यक्त केले.
‘ऐका कलियुगाचे महिमान
असत्या सी रिझले जण,
पाप देती अनुमोदन,
भरती हेडण संतांचे!’
असे सांगत उच्चप्रतीचे पाप म्हणजे भ्रूणहत्या व ही भ्रूणहत्या म्हणजेच ब्रह्महत्या समान आहे. ज्याप्रमाणे दिवा पणती शिवाय अर्थहीन आहे त्याचप्रमाणे कन्येशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे, असे मत दुर्गाताई मराठे व्यक्त करतात.