सुनील झंवर माझे मित्र होते, आहेत अन् राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:20+5:302020-12-26T04:13:20+5:30
जळगाव : सुनील झंवर हे माझ्या गावाचे आहेत आणि गावाचा माणूस हा मित्रच काय तर तो एक नातेवाइकासारखाच असतो. ...
जळगाव : सुनील झंवर हे माझ्या गावाचे आहेत आणि गावाचा माणूस हा मित्रच काय तर तो एक नातेवाइकासारखाच असतो. अन् कोणी कोणाचा मित्र असू नये किंवा असावा हे काय वरून ठरून येत नाही. सुनील झंवर हे माझे मित्र होते, आहेत आणि भविष्यातदेखील राहणार असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यामुळे जिल्ह्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
बीएचआर प्रकरणी सुनील झंवर याच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांच्यासोबतच्या संबंधाबाबत सर्वच जण इन्कार करत असताना, पालकमंत्र्यांचा या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या नियोजनासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन लेवा भवन येथे करण्यात आले होते, मेळावा संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, लता सोनवणे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
काळसूत्रीमध्ये काय झाले, यासाठी खुले मैदान
झंवर यांच्याशी संबंधच ठेवू नये हे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या काळात काय झाले , हे त्यांनी बघावे यासाठी खुले मैदान आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील झंवर यांचे माझ्याशीच नाही तर त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याचे सांगितले होते. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता पालकमंत्र्यांनीदेखील झंवर यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध असल्याचे जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांचा मागणीसाठी फडणवीसांनी पुढाकार घ्यावा
कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचा बाजूने उभे राहू असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, याबाबतदेखील महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, फडणवीस यांनी केवळ टीका न करता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पुढाकार घेतला पाहिजे. तेदेखील शेतकऱ्यांचे नेते असून, केवळ टीका करण्यात वेळ वाया न घालता त्यासाठी त्यांनी काम करावे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
माझ्या कार्यालयाच्या दरवाजा कार्यकर्त्यांसाठी उघडा : संजय सावंत
ठरावीक लोकांच्याच गोतावळ्यात राहात असल्याचा आरोप चुकीचा असून, माझ्या कार्यालयाचा दरवाजा कार्यकर्त्यांसाठी नेहमी उघडा असल्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवकपदाचे उमेदवार असलेला कार्यकर्ता अडचणीत असल्याने त्याची समस्या सोडविण्यासाठी शहरात खास आलो होतो. मात्र, मी ठरावीकांच्याच गोतावळ्यात फिरतो, हा आरोप चुकीचा असल्याचे सावंत म्हणाले.