सुनील झवर माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय; चौकशीत सर्व निष्पन्न होईल- गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 07:45 PM2021-08-13T19:45:19+5:302021-08-13T19:46:08+5:30
पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.
जळगाव : बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झवर हे माझ्यासह सर्वांचेच निकटवर्तीय आहे. पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे, त्यात सर्व काही निष्पन्न होईल, असा दावा माजी मंंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात केला.
दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशात पाऊस नसल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी पत्रकारांशी बोलताना झवर यांच्याविषयी त्यांनी वरील वक्तव्य केले.
कोणी सांगावे, निकटवर्तीय नाही?
बीएचआर पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात मास्टरमाईंड सुनील झवर याला अटक झाल्यानंतर त्याचे कोणा-कोणाशी संबंध आहे, कोण निकटवर्तीय आहे, या विषयी चर्चा सुरू झाली आहे. सोबतच झवर याच्याकडे काही मंडळींचे कागदपत्रेही सापडले. या अटकेनंतर झवर हे आपले निकटवर्तीय असण्याविषयी गिरीश महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. कायद्यानुसार जे होईल ते होणारच आहे. झवर हे तर सर्वांचेच निकटवर्तीय असून तसे नसल्यास कोणी सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात त्यांनी अधिक बोलणे टाळले.
सरसकट मदत करा
पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुबार, तिबार पेरण्या करूनही त्या वाया जात आहे. सर्वच पिके नष्ट झाले असून नदी, नाले, धरणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, जो पर्यंत ढग आहे, तोपर्यंत कृत्रिम पावसासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. या विषयी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनदेखील दिले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंत्र्यांचे केवळ दौरे, जिल्हावासीयांची निराशा
महाविकास आघाडीतील मंत्री निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे दौरे करीत आहे. त्यांनी यावे, मात्र जिल्ह्यासाठी काहीतरी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हे मंत्री येऊन निघून जातात, मात्र शेतकरी, सामान्य जनता यांचा विचार करीत नसल्याचा आरोप महाजन यांनी केला. गावागावत विजेचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनाही पुरेसी वीज मिळत नाही, रोहित्र जळाले तर ते मिळत नाही व ऑईलचे कारण सांगितले जाते. इतकी बिकट राज्यात कधी नव्हती. अशा परिस्थितीकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.