चाळीसगावला अंकुर महोत्सवात ‘सूरमयी धुंद केवडा दरवळला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:42 PM2019-11-25T12:42:53+5:302019-11-25T12:44:27+5:30
अंकूर साहित्य संघातर्फे येथील अरिहंत मंगल कार्यालयात तीन दिवसीय अंकूर महोत्सव झाला.
चाळीसगाव, जि.जळगाव : अंकूर साहित्य संघातर्फे येथील अरिहंत मंगल कार्यालयात तीन दिवसीय अंकूर महोत्सव झाला. कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गायक, वादक व विनोद मूर्ती गिरीश मोघे आणि सहकाऱ्यांनी गुंफले. संपूर्ण खान्देशासह संबंध महाराष्ट्रात आपल्या गायकी व वादनाच्या जोरावर आपले स्थान अढळ ठेवले. ‘सांजवेळ सप्तसुरांची मैफिल गीत संगीताची’ कार्यक्रमाने चाळीसगावकर रसिकांची मने जिंकली.
सांस्कृतिक विचार मंचावर डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर, अंकूर साहित्य संघ जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.साधना निकम, जिल्हा सचिव व पर्यावरण मित्र शालिग्राम निकम, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पोतदार होते. या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उ.भ. काळे, स्मिता पाटील, राजेंद्र गवळी, गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रमेश पोतदार व डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रा.श्यामकांत निकम यांनी केले. डॉ.साधना निकम यांनी प्रास्ताविक सादर केले. स्वागतपद्य प्रार्थना दायमा हिने सादर केले.
गिरीश मोघे समवेत दुष्यंत जोश , श्रृती वैद्य, पूर्वा कुळकर्णी यांनी व स्थानिक कलाकार श्रावणी कोटस्थाने, गायत्री चौधरी व स्नेहल सापनर यांनी सुंदर भावगीतं, भक्तीगीते व नाट्यगीतं म्हटली. सुधीर मोघे यांनी सुंदरसे विनोद सांगून रसिकांना खिळवून ठेवले. चाळीसगावकर रसिकांनी टाळ्याची साथ देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमासाठी तबल्याची साथ गिरीश मोघे, संवादिनीवर दुष्यंत जोशी तर ढोलकीची साथ अजिंक्य त्रिभुवन यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अशोक वाबळे, पी.एस.चव्हाण, प्रवीण अमृतकार, प्रा.तुषार चव्हाण, आधार महाले, मंगला कुमावत, नलिनी पाटील, अरूण जाधव, सोमेश्वर कासार, प्राचार्य शिवाजीराव साळुंखे यांनी परिश्रम घेतले.