पाचोऱ्यात ‘कोरोना’ युध्दात पोलिसांसोबत ‘सुपर ६२’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 06:05 PM2020-04-14T18:05:51+5:302020-04-14T18:06:50+5:30
‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत.
महेश कौडिण्य
पाचोरा, जि.जळगाव : जगभरात हजारोंचे प्राण घेणाºया ‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत.
पाचोरा प्रशासकीय विभाग, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन अहोरात्र कोरोना विरोधात लढा देण्यासाठी संघर्ष करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने सुरू झालेले लॉकडाऊन पाचोरा शहरात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असून पोलिस आणि प्रशासनाला माजी सैनिकांची चांगलीच साथ लाभलेली आहे.
प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची मागील महिन्यात माजी सैनिक संघ पाचोरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्वेच्छेने मदतीची तयारी दर्शवली. त्यावेळी पाचोरा माजी सैनिक संघाचे अध्यक्ष निवृत्त हवालदार बाळू पाटील यांनी माजी सैनिक कार्यालय जळगाव येथील अधिकारी सुभेदार मेजर वाकडे यांचेशी चर्चा करून देशसेवेसाठी या ‘कोरोना’विरूद्धच्या लढाईत सहभागाची माजी सैनिक संघाची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आणि त्यांना सैनिक कार्यालयाकडून देखील तात्काळ मान्यता मिळाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा माजी सैनिक संघाची बैठक झाली आणि कोरोना विरुद्धच्या युद्धात माजी सैनिकांनी उडी घेतली.
पाचोरा शहरातील भारत डेअरी स्टॉप, जारगाव चौफुली, राजे संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॉलेज चौक अशा प्रत्येक चौकात सकाळी सात ते एक आणि दुपारी चार ते आठ अशा वेळेत प्रत्येक ठिकाणी सहा माजी सैनिक पोलीस प्रशासनासोबत खंबीरपणे उभे राहून नियमभंग करणाºया आणि मास्क न वापरणाºया नागरिकांना समजावून सांगत आहेत तर कधीतरी कठोर भूमिका देखील घेताना दिसून येत आहेत. याशिवाय पाचोरा शहरातील पेट्रोल पंप, धान्य मार्केट आणि राणीचे बांबरुड, नांद्रा,शिंदाड यासारख्या खेड्यांवरदेखील दोन दोन माजी सैनिक नागरिकांमध्ये कोरोना जागृतीचे धडे देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ही सेवा पूर्णपणे नि:स्वार्थ असून देशाला एका संकटातून बाहेर काढण्यासाठी सैनिक नेहमीच पुढे असतो हे दाखवणारे हे चित्र अनेकांना प्रोत्साहित करून जाते. पाचोरा शहराच्या मुख्य रस्त्यांवर बाळू पाटील, समाधान पाटील, भगवान पाटील, दीपक पाटील, दीपक सांगळे ,सौमित्र पाटील, रावसाहेब पाटील, श्यामसिंग राजपूत, शांताराम शिंदे, संतोष मोरे, गणेश साळुंखे, हेमंत जोशी यांच्यासह ६२ माजी सैनिक उभे असून पूर्वी देशाच्या सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत होतो आता गावाच्या सीमेवर उभे राहून गावाचे रक्षण करीत आहोत हे अभिमानाने सांगतात त्यावेळी कोरोना पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही ही भावना अनेकांच्या मनात निर्माण होते.
माजी सैनिकांनी स्वत: पुढे येऊन या राष्ट्रीय संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आणि योगदान देण्यासाठी तयारी दर्शवली. आज पोलिस आणि प्रशासनाला त्यांची चांगलीच मदत होत असून ते आधी देशाची बाह्य सुरक्षिततेचे रक्षण करत होते आज ते देशाची अंतर्गत सुरक्षितता तेवढ्याच प्रामाणिकपणे करीत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.
-अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक, पाचोरा
सीमेवर लढताना शत्रू कोण हे दिसत होते आणि कळतदेखील होते परंतु या संकटाच्या वेळी अदृश्य शत्रू असल्याने हा लढा खूप वेगळा असून नागरिकांनी जागृत होणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे अधिक गरजेचे आहे.
-बाळू पाटील, अध्यक्ष, माजी सैनिक संघ, पाचोरा