लसीकरण केंद्रावर ताटकळणाऱ्या वृद्धांसाठी धावले पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:07+5:302021-05-09T04:17:07+5:30
फोटो जळगाव : शाहू महाराज रुग्णालयात लसीकरणासाठी होणारा गोंधळ व उन्हातान्हात ताटकळत बसलेल्या वृद्धांची अवस्था पाहता पोलीस अधीक्षक डॉ. ...
फोटो
जळगाव : शाहू महाराज रुग्णालयात लसीकरणासाठी होणारा गोंधळ व उन्हातान्हात ताटकळत बसलेल्या वृद्धांची अवस्था पाहता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी थेट रुग्णालयात जाऊन लसीकरणाची शिस्त लावली, इतकेच नव्हे तर भरउन्हात बसलेल्या वृद्धांना पोलीस खर्चातून पाणी व बिस्किट तात्काळ उपलब्ध करून दिले.
शाहू महाराज रुग्णालयात लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी व गोंधळ होत असल्यामुळे काही नागरिकांनी पोलीस बंदोबस्तासाठी शहर पोलीस ठाण्यात फोन केले, तर काहींनी थेट पोलीस अधीक्षकांना फोन केले. कार्यालयात असलेले डॉ.मुंढे तातडीने केंद्रावर दाखल झाले. तेथील परिस्थिती पाहिली असता १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लस दिली जात होती, तर ४५ पासून पुढील वयोगटातील नागरिक रांगेत उभे होते. काही जण तर पहाटे ५ वाजेपासून आलेले होते. या वृद्ध लोकांनी थेट पोलीस अधीक्षकांना गराडा घातला. त्यांची कैफियत ऐकून डॉ. मुंढे यांना धक्काच बसला. त्यांनी सर्वात आधी पोलीस विभागाच्या मानव संसाधन निरीक्षकांना तातडीने फोन करून पोलीस खर्चातून या केंद्रावर बिस्किट व पाण्याच्या बाटल्या घेऊन येण्याचे आदेश दिले. निरीक्षक अरुण धनावडे व सहकारी तातडीने दाखल झाले. सर्वच लोकांना बिस्किट व पाण्याच्या बाटल्या स्वतःच्या हाताने वाटप केल्या. लसीकरणाबाबत वेगवेगळे गट तयार करून त्यांच्या वेगवेगळ्या वेळा निश्चित केल्या. तसेच टोकण पद्धत सुरू करून गर्दी कमी करण्यात आली. दरम्यान, डॉ.मुंढे यांनी लसीकरणाची टोकण व वेळ ठरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. येथे शिस्त लावल्यानंतर इतर केंद्रांवरही त्यांनी भेटी दिल्या. प्रभारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी केंद्रावर वारंवार भेटी देण्याबाबत सूचना केल्या.