शालेय पोषण आहार योजनेत पूरक म्हणून आता दूध भुकटीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 08:18 PM2018-08-25T20:18:45+5:302018-08-25T20:19:05+5:30
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ
चोपडा, जि.जळगाव : इयत्ता पहिली ते आठवीसाठी दिला जाणारा शालेय पोषण आहार योजनेत पूरक योजना म्हणून आता शाळाशाळांमध्ये दूध भूकटीची वाटप योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यात सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भुकटीच्या संदर्भात शासन स्तरावरून करण्यात येणाऱ्या उपाययोजना म्हणून १० जुलै रोजी शासनातर्फे विधानसभेत निवेदन करण्यात आले होते. सदर निवेदनामध्ये राज्यात विविध विभागामार्फत सुरू असलेल्या पोषण आहार योजनेमध्ये दूध अथवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता. शालेय पोषण आहार योजनेत पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्याचा निर्णयही शासनाने घेतलेला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा शाळांमध्ये दूध भुकटीपासून तयार केलेले दूध देण्यासाठी एका विद्यार्थ्यास एका महिन्यात २०० ग्रॅम दूध भुकटीचे एक पाकीट असे तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची तीन पाकिटे विद्यार्थ्यास घरी देण्यात येतील. सदर भुकटीमधून पालकांनी त्यांच्या पाल्यांना दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. सदर दूध भुकटीचे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी वाटप करण्यासाठी संबंधित शाळांना दूध भुकटी वाटप दिवस जाहीर करून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत संबंधित विद्यार्थ्यांना दूध भुकटीचे पाकीटे वाटप करावीत. त्याच दिवशी सदर भुकटीपासून दूध कसे तयार करावे. याबाबत सविस्तर सूचना विद्यार्थ्यांना द्याव्या. सदर योजना तीन महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे व पुरविण्यात येणारी दूध भुकटी ही महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेली असावी. दूध भुकटी वाटपाच्या अंमलबजावणीसाठी समितीही गठित करण्यात आल्याचे संबंधित शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.