जळगाव जिल्ह्यातील १४ निवारागृहात १३५२ स्थलांतरितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:44 PM2020-04-02T21:44:52+5:302020-04-02T21:46:48+5:30

मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेशासह महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांचा समावेश

Support to 2 migrants in 4 shelters in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील १४ निवारागृहात १३५२ स्थलांतरितांना आधार

जळगाव जिल्ह्यातील १४ निवारागृहात १३५२ स्थलांतरितांना आधार

Next

जळगाव : कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर स्थलांरितांची संख्या वाढत असून गुजरात, मध्यप्रदेशकडे पायी जाणाऱ्या नागरिकांना जळगावात आधार दिला जात असून जिल्हा प्रशासनाने ८ तर कामगार विभागाने ६ असे एकूण १४ निवारागृह उभारले आहे. या निवारागृहामध्ये आतापर्यंत १ हजार ३५२ नागरिक, मजुरांना ठेवण्यात आले आहे. यातील अनेक मजूर हे परप्रांतीय असून ते पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन याठिकाणी ठेवण्यात आले व त्यांना पूर्ण सोयी सुविधा प्रशासन देत आहे.
कोरोना विषाणूची नागरिकांना लागण होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांना काम नसल्याने ते आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य देत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवाऱ्यांमध्ये ठेवले आहे. या निवारागृहात नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करुन देत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे मजूर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना शासनाच्या सुचनांनुसार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.
सर्वाधिक राजस्थानातील १४६ मजुरांचा समावेश
स्थलांतरीत नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोदाम या तीन ठिकाणी तसेच तरवाडे, ता. पारोळा, कर्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, खडकदेवळा बुद्रुक ता. पाचोरा, के. आर. कोतकर महाविद्यालय, चाळीसगाव, बोथरा मंगल कार्यालय, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा इत्यादी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे. शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरीतांची सोय जिल्ह्यात करण्यात आली आहे. जळगाव शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील वेगवेगळ््या भागातील ११० मजुरांचा समावेश आहे.
निवाºयात येण्यापूर्वी आरोग्य तपासणी
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, मॅरेज हॉल बेघर, रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी, तहसीलदारांना केलेल्या आहेत. त्यानुसार त्या-त्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आवश्यकतेनुसार निवारागृह सुरु केले आहे. जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय अधिग्रहीत केले आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली. मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, मेहरुणचे तलाठी सचिन माळी, शहर तलाठी रमेश वंजारी हे मंगल कार्यालयात थांबून या सर्व स्थलांतरित मजुरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवित आहे. या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येथे भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष असून त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या निवाºयामध्ये वास्तव्य करणारा उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बबलू पांडे हा ३२ वर्षीय तरुण येथे मिळणाºया सोयी सुविधांवर समाधान व्यक्त करताना म्हणाला की आम्ही गेली ३ ते ४ दिवसांपासून येथे वास्तव्यास आहोत. आम्हाला आल्यापासून कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण झाली नाही. प्रशासन आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. घरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथील विकास यादव येथील सुविधांबाबत म्हणाला की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, त्याहीपेक्षा अधिक चांगली काळजी आमची जळगाव जिल्हा प्रशासन घेत असल्याचेही त्याने नमूद केले.

Web Title: Support to 2 migrants in 4 shelters in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.