गुप्तचर यंत्रणेच्या अपयशानेच दिल्लीत हिंसाचार - सुप्रिया सुळे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:18 PM2020-02-29T12:18:48+5:302020-02-29T12:19:21+5:30
गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी
जळगाव : दिल्लीत घडलेला हिंसाचार हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानीतच हिंसाचार उसळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असेही सुळे यांनी या वेळी नमूद केले.
खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवार, २८ रोजी जळगावच्या एकदिवसीय दौºयावर आल्या असता यामध्ये शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या, त्या वेळी त्यांनी हा आरोप केला.
त्या पुढे म्हणाल्या, दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयाकडून झालीच पाहिजे. मात्र तत्पूर्वी गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अमेरिकेसारख्या एका मोठ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात असताना राजधानीत असा हिंसाचार म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे सपशेल अपयश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अमित शाहांच्या जागी मी असते तर आत्मचिंतन केले असते
गेली पाच वर्षे ज्यांनी पारदर्शक काम केल्याचा दावा करणाºया केंद्र सरकारने दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी त्यांच्यावर होणाºया आरोपांना उत्तर देत त्यासाठी जाहीर माहिती दिली पाहिजे, अशी मागणी करीत अमित शाहा यांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते, असेही खासदार सुळे यांनी या वेळी नमूद केले.
महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे
महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर चांगले काम करीत असून महिला सुरक्षेच्या दृष्टीनेही हे सरकार अतिशय संवेदनशील आहे. महिला सुरक्षेसाठी अजून कठोर कायदे सरकार करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.