Supriya Sule: मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:50 PM2022-05-17T20:50:39+5:302022-05-17T20:51:32+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथील भाषणात भाजपवर हल्ला चढविताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती
जळगाव - मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कुणाच्या बापाची औकात नाही. पण होय, आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे ती शिवसेनेच्या अनाचारापासून, अत्याचारापासून अन् भ्रष्टाचारापासून. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रविवारच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. तसेच, तुमच्या सत्तेचा ढाचा खाली खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीलाही लक्ष्य केले. फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथील भाषणात भाजपवर हल्ला चढविताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. ठाकरेंच्या आरोपांना रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत फडणवीस म्हणाले की, मी सहल म्हणून नाही तर संघर्षासाठी अयोध्येला गेलो. कारसेवा केली. आम्ही कधी फाइव्ह स्टारचे राजकारण केले नाही. गोळ्या चालताना पाहिले, लाठ्या खाल्ल्या म्हणून इथवर पोहोचलो. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असा घणाघात फडणवीसांनी केला होता.
सुप्रिया सुळेंचं उत्तर
मुख्यमंत्र्यांनी माझ्या वजनाचा उल्लेख केला. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे राजकीय वजन कमी करू शकत नाही. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणल्याशिवाय राहणार नाही. वजनदार लोकांशी सांभाळून राहा, असा इशाराच फडणवीस यांनी दिला. फडणवीसांच्या या इशाऱ्यावर सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, सुळे यांनी हसत उत्तर दिले. मी खूप घाबरले आहे, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. या उत्तरावर सभागृहात हशा पिकला होता.