बीएचआर प्रकरणात सुरज झंवरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:22+5:302021-01-23T04:16:22+5:30
जळगाव - बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला जळगावातून ...
जळगाव - बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला जळगावातून शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआर प्रकरणातील गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात धाडी टाकल्या होत्या. यावेळी सुनील झंवर तसेच बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेतून दोन ट्रक भरून संगणक, कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याच कागदपत्रांच्या आधारावर बीएचआरच्या घोटाळ्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची दोन-तीन पथके राज्यभर त्याचा शोध घेत आहे. तशातच झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला जळगावातील मू.जे. महाविद्यालय परिसरातील घरातून शुक्रवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. हे पथक सहाय्यक पोलीस निरिक्षक एच.एम.नन्नवरे यांचे होते. अटक केल्यानंतर सुरजला घेवून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
रामानंद पोलिसात केली नोंद
सुरज याच्या अटकेनंतर त्याची जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अटकेची नोंद केल्यानंतर हे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
झंवरच्या अडचणीत वाढ
नाशिकमधील मांडसांगवी येथील १०० कोटीची जमीन मुख्य संशयित सुनील झंवरने अवघ्या तीन कोटीत घेतली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश दिले होते. त्यानंतर आता अपर महसूल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णया विरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे झंवरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
कोट
सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. त्याला घेवून पथक पुण्याला रवाना झाले आहे. बीएचआर प्रकरणात ही अटक करण्यात आलेली आहे.
-भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे