बीएचआर प्रकरणात सुरज झंवर याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:22+5:302021-01-23T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर याला जळगावातून शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआर प्रकरणातील गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे.
पुणे येथील 'बीएचआर'च्या घोले रोड शाखेत रंजना घोरपडे यांची १९ लाख नऊ हजार ८६० रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजित वाणी व कमलाकर कोळी या पाच जणांना २७ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल केल्यानंतर ट्रकभर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सुरज झंवर याचा सहभाग आढळला असल्याने त्याला आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने मु.जे.महाविद्यालय परिसरातील घरातून शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. पोलिसांनी सुरज झंवर याच्या अटकेबाबत बोलण्यास नकार दिला असला तरी बीएचआर प्रकरणात अटक केली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महावीर जैनचा जामीन अर्ज फेटाळला
या प्रकरणातील संशयित आरोपी व सीए महावीर जैन याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी कामकाज होऊन न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अन्य संशयित विवेक ठाकरे, धरम साखला, सुजित वाणी यांच्या जामीन अर्जावर बुधवार, २७ रोजी सुनावणी होणार आहे.