सुरत-अमरावती एक्सप्रेसला विलंब झाल्याने भुसावळनजीक प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:09 PM2018-11-02T13:09:02+5:302018-11-02T13:09:25+5:30
दीपनगरजवळील घटना
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे दीपनगर औष्णीक विद्युत केंद्राजवळ घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे सुरत-अमरावती एक्सप्रेसला विलंब झाल्याने, प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या खाली उतरवून, पॅसेजरच्या गार्डकडे तक्रार करीत चांगलाच गोंधळ घातल्याची घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतहून अमरावतीकडे जाणारी गाडी क्र.(१९०२५) ही भुसावळ स्थानकातून रात्री साडेनऊला निघाली. ही एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच दोन तास विलंबाने धावत होती. भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर थोड्या अंतरावर दीपनगर औष्णीक केंद्राजवळ गाडी अचानक थांबली. एक तास उलटूनही एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यामुळे, प्रवाशांनी गार्डकडे चौकशी केली असता, दीपनगरजवळ तांत्रीक कामासाठी ‘मेगाब्लॉक’ घेण्यात आल्याचे समजले. रेल्वे प्रशासनातर्फे रात्री ७.३० ते ९.३० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, तांत्रीक कारणास्तव काम लांबल्याने, एका तासासाठी हा ब्लॉक वाढविण्यात आला होता. यामुळे संतप्त प्रवाशांची चांगलाच गोंधळ घातला. अखेर साडेदहाला तांत्रीक काम संपल्यानंतर, ही एक्सप्रेस अमरावतीकडे रवाना झाली. रेल्वे प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता मेगाब्लॉक घेतल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला आहे.