सुरतालाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:14 PM2018-03-10T22:14:20+5:302018-03-10T22:14:49+5:30
गीत महोत्सव : कलाकारांच्या सादरीकरणाने संध्याकाळ झालीखान्देश सं सुरमय
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.१० : सुरांची दिव्यानुभूती, तालाची नादमयता आणि सुरतालाच्या रंगलेल्या रोमांचकारी जुगलबंदीने खान्देश संगीत महोत्सवाचा कळसाध्याय गाठत रसिकांना भारावून टाकले. शनिवारी सायंकाळी सहा वाजता राजपूत लोकमंगल कार्यालयात झालेल्या स्वरोत्सवात चाळीसगावकरांची सायंकाळ सूरमयी झाली.
महोत्सवाचे दीपप्रज्वालन व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रशांत मोराणकर, उद्योगपती प्रवीणभाई पटेल, अंबाजी ग्रुपचे मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, शरद मोराणकर आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बासरी वादक पंडित विवेक सोनार, सचिव घनश्याम सोनार यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला स्थानिक कलावंतांनी समूह गायन, सरगम व बासरी वादन सादर केले.
‘तेरोहि ध्यान धरू दाता’
चाळीसगावचे भूमिपुत्र धृपद गायक सागर मोराणकर यांनी राग गावतीमध्ये अलाप जोड व त्यानंतर चौतालात ‘तेरोहि ध्यान करू दाता’ यासह सुरतालात ‘कर्म करिजो मेरे साई’ तर सुततालातील ‘दुर्गे भवानी माता काली’ ही बंदीश सादर करून टाळ्यांची दाद मिळवली.
रंगली सुरतालाची जुगलबंदी
पंडित विवेक सोनार यांनी बासरीवर राग यमन सादर केला. त्यांना तबल्यावर उस्ताद फजल कुरेशी यांनी साथसंगत केली. बासरीचे सुर आणि तबलाचा ताल ही जुगलबंदी रसिकांना खिळवून ठेवणारी ठरली. विवेक सोनार यांनी सादर केलेल्या ‘धून’लाही दाद मिळाली.
सुफी बंदीशीने सांगता
महोत्सवाची सांगता गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांच्या गायनाने झाली. त्यांनी पारंपरिक सुफी बंदीश ‘करिम करो’ सादर करून वाह..वाह.. मिळवली. त्यांनीच गायलेल्या भैरवीने सांगताही झाली.
यावेळी पंजडत विवेक सोनार यांनी गुरुकुल प्रतिष्ठान राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नारायणदास अग्रवाल, वसंतराव चंद्रात्रे, नवीन दुग्गड, प्रेमचंद खिंवसरा, दिलीप रामराव चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.विजय गर्गे यांनी केले.