सुरेशदादांच्या जामिनात अट टाकण्याचा अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 12:08 AM2017-01-05T00:08:12+5:302017-01-05T00:08:12+5:30
राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे़
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच बिनशर्त जामीन मंजूर केलेला आहे़ त्यात अटी-शर्ती घालाव्या, असा अर्ज राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़ त्यावर बुधवारी कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे़
सुरेशदादा जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०१६ रोजी बिनशर्त जामीन मंजूर केला होता़ प्रकरणातील इतर संशयितांना जामीन देताना न्यायालयाने अटी व शर्ती घातल्या आहेत़ मात्र सुरेशदादा जैन यांना बिनशर्त जामीन मंजूर झाला़ ते माफीच्या साक्षीदार व नंतर आरोपी झालेल्या सिंधू कोल्हे यांच्यावर दबाव आणू शकतात़ कोल्हे यांचा खटला वेगळा चालवला जात आहे़ त्यामुळे जामिनाबाबत अटी व शर्ती टाकण्यात याव्या, असा अर्ज राज्य शासनाचे वकील निशांत कातणेश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता़
त्यावर बुधवारी न्या़ शरद बोबडे व न्या़ नागेश्वर राव यांच्या पीठापुढे कामकाज झाले़ सुरेशदादा जैन यांच्याकडून अॅड़ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली़ दोघांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे़