सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप
By विलास बारी | Published: May 11, 2024 11:15 PM2024-05-11T23:15:45+5:302024-05-11T23:16:07+5:30
मी कुणाच्या दबावात येत नाही: सुरेशदादा.
जळगाव: ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी दबावाखाली जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला; परंतु आपण कोणाच्या दबावात येणारे नसून, राज्य आणि जळगाव शहराच्या विकासासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचे, सुरेशदादा जैन यांनी `लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनीही सुरेशदादा जैन हे कोणाच्या दबावात येणारे व्यक्तिमत्व नसल्याची प्रतिक्रिया, सावंत यांच्या दाव्याचा प्रतिवाद करताना व्यक्त केली.
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाच्या सुरेशदादांसोबतच्या भेटीनंतर दोन तासांतच, उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरेशदादांवर दबाव टाकून त्यांच्याकडून `स्क्रिप्ट’ वाचून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेशदादांनी मतदानाच्या तोंडावर उद्धवसेनेचा दिलेला राजीनामा, भाजपला पाठिंब्याबाबत त्यांना वाचायला दिलेली `स्क्रिप्ट’, हे प्रकार भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याकडे निर्देश करणारे आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांनी दबाव टाकून सुरेशदादांना हे प्रकार करायला लावले, असा थेट आरोप संजय सावंत यांनी केला.
विकासासाठी भाजपसोबत: सुरेशदादा
सावंत यांच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी `लोकमत’ने सुरेशदादा जैन यांच्याशी संपर्क केला असता, आपण कुणाच्या दबावात येणारे नसून देश, राज्य आणि जळगाव शहराच्या विकासासाठी भाजपला समर्थन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याची स्थिती पाहता, विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, असे ते म्हणाले. गिरीश महाजन यांच्यासोबत आपली १९९२ पासून मैत्री आहे. त्यावेळी निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या विरोधात ईश्वरलाल जैन उभे होते. त्यावेळीदेखील आम्ही गिरीश महाजन यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे संजय सावंत यांच्या आरोपात काही तथ्य नाही, अशी पुस्तीही सुरेशदादांनी जोडली.
सुरेशदादा कोणत्याच दबावापुढे झुकणारे व्यक्तिमत्त्व नाही. दबाव, घाबरले, हे शब्द दादांना लागू पडत नाहीत. मोदी जगमान्य नेतृत्व आहे, म्हणून त्यांनी आम्हाला समर्थन, आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आमची ताकद नक्कीच वाढली आहे. मागील निवडणुकीतही दादा सोबतच होते.
- गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री