सुरेशदादा जैन विधानसभा निवडणूक लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:54 PM2019-07-02T12:54:16+5:302019-07-02T12:54:41+5:30
जळगाव मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची माहिती तर्क-वितर्काना ‘ब्रेक’
जळगाव : गेल्या पाच वर्षात शहराची वाट लागली असून, शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आगामी विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सोमवारी दिली. अनेक महिन्यांपासून सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार की नाही ? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर त्याला आता विराम लागणार आहे.
मनपाच्या सोळाव्या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्यांचा दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. सुरेशदादा जैन यांनी गेल्या ५ वर्षाचा कालखंड सोडल्यास सलग ३५ वर्ष त्यांनी शहर व तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या पाच वर्षात जळगाव शहराचे अक्षरश: वाटोळे झाले असून, शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी व कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढविण्यास तयारी दर्शविली आहे.
पदाधिकाऱ्यांकडून मनधरणी
शहरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरेशदादा जैन यांनी आपण यंदा विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, सुरेशदादा जैन हे शिवसेनेच्या पहिल्या टॉप नेत्यांमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीत युतीलाच यश मिळणार असून सुरेशदादा जैन यांनीच शहराचे प्रतिनिधीत्व करावे अशी इच्छा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती. त्यानुसार माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, राजू अडवाणी, विजय वाणी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे व श्याम कोगटा या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरेशदादा जैन यांची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मनधरणी केली जात होती. अखेर शनिवारी झालेल्या बैठकीत सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढविण्यास होकार दिल्याची माहिती महाजन यांनी दिली.
कुटूंबियांशी चर्चेनंतर निर्णय
पदाधिकाºयांकडून निवडणूक लढविण्याबाबत आग्रह होत असल्याने सुरेशदादा जैन यांनी आधी कुटूंबियांशी चर्चा केली. कुटूंबियांनी पाठींबा दिल्यानंतरच सुरेशदादा निवडणूक लढण्यास तयार झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सुरेशदादा हे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार असतील. निवडणुकीनंतर सहा महिन्यातच गाळे व हुडकोचा प्रश्न ते सोडवतील असेही महाजन म्हणाले.
आपण आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असून, कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून यंदाची निवडणूक लढविण्याबाबत सारखा आग्रह होत असल्याने हा निर्णय आपण घेतला आहे.
-सुरेशदादा जैन, माजी मंत्री