आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:01+5:302021-08-28T04:21:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन ...

Surprise ..! Jalgaon declared as a waste free city | आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

आश्चर्यम्..! जळगाव कचरामुक्त शहर म्हणून घोषित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांचे रेटिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन स्टार देण्यात आले असून, कचरामुक्त शहर म्हणूनदेखील जळगाव शहराची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पथकाने शहराचे सर्वेक्षण केले होते. एकीकडे शहरातील मुख्य भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. मनपाकडे दररोज विविध भागांमधून कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित झाल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचऱ्याचे संकलन व हगणदारीमुक्तीची स्थिती या आधारावर सहा हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. याआधीच जळगाव शहर हगणदारीमुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. २०२० मध्येदेखील जळगाव शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन स्टार मिळवले होते. आता यावर्षीदेखील जळगाव शहराला तीन स्टारच मिळाले आहेत.

या आधारांवर करण्यात आली निवड

१. फेब्रुवारी महिन्यात शहरातील कचऱ्याच्या स्थितीवर सर्वेक्षण करण्यात आले.

२. जळगाव शहरातील एकूण जमा होणारा कचरा, घरांमधून संकलन होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण.

३. दैनंदिन संकलनातून ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण व एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रिया

४. शहरातील पाण्याच्या स्त्रोतांमधील स्वच्छता.

५. एकूण जमा होणाऱ्या कचऱ्यावर ७० टक्के प्रक्रिया होणे गरजेचे होते.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

एकीकडे शासनाने जळगाव शहराची कचरामुक्त शहर म्हणून घोषणा केली असताना, दुसरीकडे शहरातील कचऱ्याची स्थिती मात्र भयावह आहे. शहरातील चौकाचौकात, गल्ली-बोळांमध्ये, रस्त्या-रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच अनेक भागात तर तीन-तीन दिवस कचरा उचलला जात नाही, असे असतानादेखील जळगाव शहराला कचरामुक्त शहराचा दर्जा देण्यात आल्याने, शासनाच्या पथकाने केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महासभेनेच करून दिला होता ठराव

महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक नगरसेवक शहरातील कचऱ्याचा समस्या या प्रशासनाकडे मांडत असतात. मात्र, डिसेंबर २०२० मध्ये शासनाकडे कचरामुक्त शहराबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी महासभेतच जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून घोषित करण्याचा ठराव करण्यात आला होता. एकीकडे कचऱ्याची समस्याही मांडायची आणि दुसरीकडे कचरामुक्त शहराचा ठराव मांडायचा, पदाधिकाऱ्यांच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे शहरातील समस्या मार्गी लागताना दिसून येत नाही.

कोट...

जळगाव शहर कचरामुक्त शहर म्हणून जाहीर झाले आहे. शहराला तीन स्टार मिळाले आहेत. यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची होती. शहराला यामुळे फायदा होणार असून, मनपाला शासनाकडून १५व्या वित्त आयोगातून चांगला निधी प्राप्त होईल. तसेच शहराला प्रोत्साहनपर निधीदेखील मिळणार आहे.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा

Web Title: Surprise ..! Jalgaon declared as a waste free city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.