आश्चर्य...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम यांचेही मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:00+5:302021-05-11T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील नागरिक, नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. हा पूल टी आकारात करण्यात यावा यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ऑनलाइन पद्धतीत अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचे लक्षात आले असून, यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ही मतदान झाल्याची बाब समोर आली आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ऑनलाइन मतदान प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी समोर आणल्या आहेत. तसेच या प्रक्रियेत कोणतीही विश्वसनीयता नसून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे. ही प्रक्रिया केवळ नावालाच असून, ज्या व्यक्तीकडे ही लिंक जाईल तो व्यक्ती मतदान करू शकतो. मग तो व्यक्ती शिवाजीनगर भागातील असो वा नसो, शहरातील कोणत्याही भागातील नागरिक या पुलाच्या कामाबाबत आपले मत नोंदवू शकतो. यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांच्या मतांची नोंद कशी होऊ शकते. त्यामुळे या ऑनलाइन मतदान प्रक्रियेला कोणताही अर्थ नसल्याचाही दावा गुप्ता यांनी केला आहे. शिवाजीनगरातील नागरिकांची मागणी एल आकाराचा पुलाचीच असून, टी आकाराच्या पुलाला या भागातील नागरिकांचा विरोध असल्याचाही दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे, तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे हे मात्र टी आकाराचा पुलासाठी आग्रही आहेत. या मुद्द्यावरून सध्या शिवाजीनगरातील राजकारण पेटलेले आहे. तसेच नागरिकदेखील दोन गटांत विभागले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरदेखील नवा पेच निर्माण झाला आहे.
टी आकाराचा पूल रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
शिवाजीनगरातील काही नागरिकांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता, शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने हे काम सुरू ठेवावे. तसेच आराखड्यानुसार हे काम न करता जुन्या पद्धतीने काम करण्याची मागणीदेखील या भागातील नागरिकांनी केली आहे. मात्र भविष्यात या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ब्राह्मणसभेत जवळ मंजूर असलेल्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात यावे, अशीही मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.