आश्चर्य...पोषण आहाराचा अहवाल निकृष्ट नव्हे उत्कृष्टच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 09:19 PM2017-10-13T21:19:01+5:302017-10-13T21:19:50+5:30
भुसावळ तालुक्यातील गोजोरे, कंडारी, मोंढाळे या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतून जप्त करण्यात आलेल्या पोषण आहाराचा माल हा निकृष्ट नसून उत्कृष्टच असल्याचा अहवाल नाशिक येथील अन्न व औषध तपासणी विभागाकडून देण्यात आला आहे. नुकताच हा अहवाल जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१३-भुसावळ तालुक्यातील गोजोरे, कंडारी, मोंढाळे या गावातील जि.प.प्राथमिक शाळेतून जप्त करण्यात आलेल्या पोषण आहाराचा माल हा निकृष्ट नसून उत्कृष्टच असल्याचा अहवाल नाशिक येथील अन्न व औषध तपासणी विभागाकडून देण्यात आला आहे. नुकताच हा अहवाल जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. मात्र अन्न व औषध विभागाकडून देखील संबधित पुरवठादाराला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून, त्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जुलै महिन्यात जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्या पल्लवी सावकारे, जयपाल बोदडे व माधुरी अत्तरदे यांनी भुसावळ तालुक्यातील तीन ते चार गावांमधील जि.प.प्राथमिक शाळांना भेट दिली होती. संबधित शाळांमध्ये तपासणी केली असता, आहारामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर जि.प.सदस्यांनी हा माल जमा करून शिक्षणाधिकाºयांकडे जमा केला होता. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा माल तपासणीसाठी नाशिक येथील अन्न व औषध पुरवठा विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविला होता.
तीन महिन्यानंतर मिळाला अहवाल
नाशिक येथील प्रयोगशाळेत हा माल तपासणीसाठी जुलै महिन्यात पाठविण्यात आला होता. तब्बल तीन महिन्यानंतर हा अहवाल शिक्षण विभागाला बुधवारी प्राप्त झाला. हा अहवाल ‘नील’ आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली. तसेच शिक्षणाधिकाºयांकडून या अहवालाची प्रत मागितली असता. शिक्षण विभागाच्या एका कर्मचाºयाकडे ही प्रत असून, संबधित कर्मचारी आजारी असल्याने त्यांच्याकडून अहवालाची प्रत घेतल्यानंतर शनिवारी ही प्रत दिली जाईल अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोट..
जि.प.उपाध्यक्ष, संबधित गावांचे सरपंच व माल जप्त करण्यात आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक यांच्या समोरच पोषण आहाराचा माल फोडल्यानंतर तो माल निकृष्ट आढळून आला होता. मात्र नाशिकहुन आलेला अहवाल चक्क ‘नील’ आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा काही राजकीय व्यक्तींकडून पुरवठादाराचा बचाव करण्यासाठी पुरेपुर वापर केला जात आहे. त्यामुळे त्या विरोधात न्यायालयात जाणार आहे.
-पल्लवी सावकारे, जि.प.सदस्या