तणाव कमी करण्यासाठी गुरुला शरण जा - दादा महाराज जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:49 PM2018-07-28T12:49:31+5:302018-07-28T12:51:24+5:30
जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार
जळगाव : द्रव्याचा लोभ आणि अहंकाराचा उद्रेक होत असल्याने आज प्रत्येकामध्ये तणाव वाढत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी गुरुरुपी खऱ्या सख्याची आज गरज असून समाजातील अशा सत्पार्थी गुरुला शरण जा, असा सल्ला चिमुकले श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प.दादा महाराज जोशी यांनी दिला.
गुरुपौर्णिमेनिमित्त कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी दुपारी आयएमए सभागृहात ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञता पूर्वक गौरव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी दादा महाराज जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार, सत्कारार्थी ज्येष्ठ डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ. सुनील व्ही. चौधरी उपस्थित होते.
यंदा रौप्य महोत्सवी वर्षात प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ. सुनील व्ही. चौधरी यांचा दादा महाराज जोशी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. पाध्ये यांचा दादा महाराज व डॉ. पुष्पा चौधरी यांचा वैद्य जयंत जहागिरदार व माधुरी जहागिरदार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
हा सामाजिक गुरुंचा सन्मान
परमार्थ आणि व्यवहार यांचा जेव्हा सन्मवय साधला जातो तेव्हा ती व्यक्ती कृतार्थ होते. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेने कृतार्थ झालेल्या ज्येष्ठ डॉक्टरांचा गौरव म्हणजे सामाजिक गुरुंचा सन्मान आहे, असे दादा महाराज जोशी यांनी नमूद केले. गुरु दुर्जनांचा नाश करतात, असे सांगत दादा महाराज जोशी यांनी चंदन आणि वंदन तसेच पूजा आणि नमस्कार याविषयी माहिती दिली.
सेवेची संधी द्या, कधीही पूर्ण करेल
सत्काराला उत्तर देताना डॉ.वैजयंती पाध्ये यांनी देश-विदेशात केलेल्या रुग्णसेवाच अनुभव सांगून वैद्य जहागिरदार यांनी सेवेची संधी द्यावी, त्यासाठी आपण केव्हाही तयार राहू अशी ग्वाही दिली.
सूत्रसंचालन वैद्य आनंद दशपूत्रे यांनी केले तर वैद्य अमित चौधरी व वैद्य नितीन वाणी यांनी सत्कारार्थी डॉक्टरांचा परिचय करुन दिला.
संयमी व्यक्तीमत्व
डॉ. सुनील चौधरी यांच्याबद्दल डॉ. राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अत्यंत कमी बोलणारे डॉ. चौधरी हे आरोग्य विषय काळजी कशी घ्यावी या बाबत ते त्यांच्या कृतीतूनच दाखवून देतात. कोणावरही कधी न चिडणारे डॉ. चौधरी म्हणजे संयमी व्यक्तीमत्त्व असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
सलग २५ वर्षे प्रतिष्ठानतर्फे वैद्यकीय व्याख्यानमाला व ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्काराचे आयोजन केल्याबद्दल गिरीष कुलकर्णी यांनी उपस्थितांच्यावतीने वैद्य जयंत जहागिरदार यांचा सत्कार करण्यात यावा, अशी सूचना मांडली. त्यानुसार दादा महाराज जोशी यांच्याहस्ते वैद्य जहागिरदार यांचा सत्कार करण्यात आला.
वैद्य जहागिरदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.