भडगावात आठ हजार घरांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:15 PM2019-10-17T22:15:33+5:302019-10-17T22:15:47+5:30
साथरोग नियंत्रण : आरोग्य विभागाची मोहीम, स्वच्छता व दक्षतेतून आरोग्य जपण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम उघडली असून, आजअखेर आठ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरासह तालुक्यात साथरोगांनी डोके वर काढले आहे. त्यातच शहरात एका विवाहितेसह दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य यंत्रणा खळबडून जागी झाली. आरोग्य विभागाने घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. ही मोहीम अजून तीन दिवस सुरू राहणार आहे.
आरोग्य विभागाच्या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे, कजगाव, गुढे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेळके, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतीक भोसले, डॉ.भाग्यश्री पवार तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदींचा समावेश आहे.
कोरडा दिवस पाळा
नागरिकांनी घरोघर पाण्याची टाकी, पाणी साठा हौद आदी आठवड्यातून आलटून-पालटून एक दिवस रिकामा करावा. स्वच्छ करावा. टाकी वा हौद झाकावा. पाणी उकळून गार करून प्यावे. घरा बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. झोपताना मच्छरदाणी वापरावी अशी काही काळजी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन
भडगाव शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार होण्यासाठी आरोग्य शिबिर घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी यांनी तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आदींना दिले आहे.
भडगाव शहरात डेंग्यू संशयित आठ जणांच्या रक्तांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. अजून ७ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
सध्या भडगाव शहरासह तालुक्यात बहुतांश गावांमध्ये साथ रोग आजारांचे प्रमाण वाढले आहे. यात डायरिया, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू सदृश विविध आजारांचा समावेश आहे.
आजही अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात व भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने शहरासह तालुक्यात या आजारांवर प्रतिबंधात्मक उपचार मोहीम तत्काळ दखल घेत सुरू केलेली आहे.