मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच मुक्ताईनगरात तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:05 PM2020-05-18T17:05:43+5:302020-05-18T17:07:17+5:30
मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने तालुका प्रशासनाची बैठक घेतली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मयत रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने तालुका प्रशासनाची बैठक घेतली. दरम्यान, तीन हजार नागरिकांचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले.
बैठकीस तहसीलदार श्याम वाडकर, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील, नगरपंचायत सीईओ विक्रम जगदाळे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे उपस्थित होते. यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी वेळ पडली तर वरिष्ठ पातळीवरून मान्यता घेत सीडीआरसारख्या तांत्रिक बाबींचा वापर करण्याचा विषयही चर्चेत आला तर संबंधित भागात तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या.
तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण
ज्या भागात कोरोना रुग्ण येऊन गेला त्या भागात तालुका आरोग्य विभागाच्या १० पथकांनी आरोग्य सुपरवायझर अर्जुन काळे विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४०० कुटुंबातील सुमारे तीन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. यात एकही ताप किंवा खोकल्याचा रुग्ण मिळून आला नाही, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांनी दिली.
संबंधित भागात नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी भेट देत या भागात तातडीने निर्जंतुकीकरण केले तर संपर्कातील डॉक्टरचे जुने गाव परिसरातील दवाखाना परिसर बंदिस्त केला.