भुसावळ येथे डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:07 AM2018-09-13T01:07:55+5:302018-09-13T01:08:40+5:30
प्रशासनाने छेडली डेंग्यूविरुद्ध लढाई
भुसावळ, जि.जळगाव : शहरात नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने डेंग्यूविरुद्ध लढाई छेडली आहे. शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १,२४७ घरे, २,८९० कंटेनरचा समावेश आहे. यात ५८ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी दिली.
शहरात महिनाभरात बारापेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने डेंग्यूविरुद्ध कंबर कसली आहे. याअंतर्गत वेगवेगळी पथके बनविण्यात आली आहेत. याद्वारे शहरात नियोजनपूर्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे. सिंधी कॉलनीत तीन रुग्ण डेंग्यूची लागण झाल्यानंतर येथील जवळपास ५०० व शहरातील १,२४७ घरांचा सर्व्हे करण्यात आला. यात ५८ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्या लागलीच नष्ट करण्यात आल्या. यासाठी पालिका प्रशासनातर्फे आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक, आशा वर्कर अशी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. नागरिकांनी डेंग्यूविषयी कशी काळजी घ्यावी याची माहिती असलेली पत्रके वाटण्यात येत आहेत. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहान याद्वारे करण्यात येत आहे.
शहरातील सिंधी कॉलनी परिसर, वाल्मीक नगर, समता नगर, आंबेडकर नगर, आगाखान वाडा, नसरवानजी फाईल, खडका रोड परिसर, शिवाजीनगर, जामनेर रोडला लागून असलेला परिसर, चिमटा मोहल्ला पंचशीलनगर यासह शहरातील अनेक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.
संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यासाठी पथकही गठित करण्यात आले आहे. दररोज घरामधील कंटेनरचे सर्वेक्षण होत आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. - डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, पालिका, भुसावळ
/>