जगण्यासाठी रुग्णालयात; तर मरणानंतरही अंत्यसंस्कारासाठी मोजावे लागताहेत पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:35+5:302021-04-20T10:05:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाने अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची योजना बंद केल्यामुळे नागरिकांना रुग्णालयापाठोपाठ आता स्मशानात पैसे मोजावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाने अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची योजना बंद केल्यामुळे नागरिकांना रुग्णालयापाठोपाठ आता स्मशानात पैसे मोजावे लागत आहेत. शहरातील कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अधिग्रहित केलेल्या नेरी नाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी किंवा लाकडाद्वारे अंत्यसंस्कार करायचे राहिल्यास दोन्हींसाठी दीड हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात येत आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक खाजगी रुग्णालयांमध्ये जादा पैसे मौजून उपचार घेत आहेत. मात्र, तरीही कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. लाखो रुपये खर्च करूनही कोरोनाने जीव वाचत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर मृत्यूनंतरही नागरिकांना रुग्णालयाप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारण्यात येत असल्यामुळे काही गरीब रुग्णांच्या नातलगांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. किमान कोरोनाबाधितांवर तरी मनपा प्रशासनाने मोफत अंत्यसंस्कार करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
इन्फो :
किमान दीड हजार रुपये शुल्काची आकारणी
शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत एका सामाजिक संस्थेतर्फे अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, दुसऱ्या एका मनपा नियुक्त ठेकेदारातर्फे लाकडांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अंत्यसंस्कारासाठी दोन्हीकडून किमान शुल्क आकारण्यात येत आहे. यात गॅस दाहिनीवरील अंत्यसंस्कारासाठी दीड हजार रुपये शुल्क घेण्यात येत असून, दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडूनही किमान दीड हजार रुपये आकारण्यात येत आहेत, तसेच लाकडावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास मृतांच्या नातलगांना डिझेलही विकत आणावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
रुग्णालयात बेड मिळेना, स्मशानातही जागा मिळेना
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेक रुग्णालयांत नागरिकांना बेड मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत, तर दुसरीकडे स्मशानातही जागा मिळत नसल्याने कोरोनाबाधित मृतदेहांवर उशिराने अंत्यसंस्कार होत आहेत. नेरी नाका स्मशानभूमीत जागा अपूर्ण पडत असल्यामुळे आतील इतर खुल्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
इन्फो :
गेल्या वर्षी मनपाने उचलला अंत्यसंस्काराचा खर्च
गेल्या वर्षी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनुसार मनपाने सुरुवातीचे काही महिने कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मनपाने मोफत अंत्यसंस्काराचा खर्च बंद केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मनपाने कोरोना मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलण्याची मागणी केली जात आहे.
इन्फो :
नेरी नाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी किंवा लाकडाद्वारे अंत्यसंस्कार करायचे असल्यास किमान दीड हजार रुपये शुल्क आकारले जाते. मनपाचे कर्मचारी नि:शुल्क अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडतात.
संजय नेमाडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक तथा नेरीनाका स्मशानभूमी देखभाल प्रमुख.