सूर्यवंशी, पवार व तायडे यांची मुंबईत सीबीआयकडून कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 12:54 AM2017-03-18T00:54:19+5:302017-03-18T00:54:19+5:30
इन कॅमेरा जबाब : तिघांचा मुंबापुरीत दोन दिवसांपासून मुक्काम, नोटाबदलीसाठी वापरलेली चारचाकी जि.प.तील अधिकाºयाची?
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतील नोटाबदलीच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी, बांधकाम विभागातील शाखा अभियंता नंदकुमार पवार व बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांची शुक्रवारी मुंबई येथे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने कसून चौकशी केली. तिघांचे जबाव नोंदविण्यात आले. काही मुद्द्यांवर इन कॅमेरा जबाबही घेण्यात आल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या तिघांनी काय जबाब दिले, याबाबत माहिती कळू शकली नाही.
नोटा घेऊन जाणारी चारचाकी जि.प.तील व्यक्तीची
नोटाबदलण्यासाठी चोपडा येथे जाताना जी चारचाकी वापरली ती जि.प.तीलच एका व्यक्तीची आहे. ती मात्र कुणाची आहे, हे अजून स्पष्ट झालेले नसल्याची माहिती मिळाली.
तिघे गुरुवारीच मुंबईत दाखल
सीबीआयच्या पथकाने १० व ११ मार्च अशी सलग दोन दिवस पवार, सूर्यवंशी व तायडे यांची शहरात येऊन कसून चौकशी केली होती. या चौकशीसाठी पथक ९ मार्च रोजीच शहरात दाखल झाले होते. म्हणजेच तीन दिवस सीबीआय पथक त्या वेळेस मुक्कामी होते. बीएसएनएलच्या निरीक्षण गृहात (आयक्यू) पथकाने कॅम्प आॅफीस जणू तयार केले होते. १० रोजी जि.प.मध्ये व पवार व सूर्यवंशी हे बसतात त्या ठिकाणांवर जाऊन त्यांची झाडाझडती घेतली. तसेच पवार यांच्या घरीही चौकशी झाली होती. नंतर सूर्यवंशी व तायडे यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली.
यानंतर १६ व १७ मार्च रोजी जि.प.तील या तिन्ही अधिकारी व कर्मचाºयांना चौकशीसाठी मुंबईत सीबीआयने बोलावले होते. तिघे चौकशीनंतर शुक्रवारीही शहरात दाखल झालेले नव्हते. आणखी किती दिवस चौकशी सुरू राहील याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.
जळगाव जिल्हा बँकेतील नोटाबदलीप्रकरणात मुंबईत तिघांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याने यासंबंधी संबंधितांकडून विविध मुद्द्यांवर माहिती घेतली जात आहे.
-आर.के.गौर, प्रवक्ता, सीबीआय, मुंबई
सूर्यवंशी यांचा ग.स.संचालकपदाचा राजीनामा मंजूर
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे (ग.स.) माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी यांचा ग.स.च्या संचालकपदाचा राजीनामा शुक्रवारी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूर्यवंशी यांचा राजीनामा १५ मार्च रोजी सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांच्याकडे प्राप्त झाला होता. हा राजीनामा बी.बी. पाटील यांनी कार्यकारी मंडळाकडे सादर केला. अखेर हा राजीनामा मंजूर होऊन त्याबाबतची नोंद इतिवृत्तामध्ये झाली आहे. सूर्यवंशी यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र १७ रोजी दुपारी त्यांच्या रिंगरोडनजीकच्या हर्ष रेसिडेन्सीमधील निवासस्थानी पत्राद्वारे देण्यात आले. तसेच राजीनाम्याची प्रत व इतर माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्येही देण्यात आल्याचीही माहिती मिळाली.