ग.स.संचालकपदाचा सूर्यवंशींचा राजीनामा!
By admin | Published: March 16, 2017 12:38 AM2017-03-16T00:38:11+5:302017-03-16T00:38:11+5:30
नोटाबदलीची ‘दगडी’ ठेच : चौकशी भोवली
जळगाव : ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनील सूर्यवंशी यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकपदाचा राजीनामा दिला.
चलनातील बंद झालेल्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने सुनील सूर्यवंशी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या संचालकपदाच्या राजीनाम्याबाबत दबाव येत होता.
जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता नंदकुमार पवार व सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची सीबीआयच्या पथकाने सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. तर अजूनही ते चौकशीच्या रडारवर आहेत.
चलनातील बंद झालेल्या नोटा बदल केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. सूर्यवंशी हे ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन, तर विद्यमान संचालक आहेत.
ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा बुधवारी संध्याकाळी झाली. या सभेत सुनील सूर्यवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. संचालकांच्या मागणीनंतर त्यांनीदेखील राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हातावर घडी, तोंडावर बोट
सूर्यवंशींच्या राजीनाम्यासंदर्भात प्रसारमाध्यमांसोबत बोलू नये अशी सूचना या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली. सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष तुकाराम बोरोले, सहकार नेते बी.बी.आबा पाटील, संचालक अजबसिंग पाटील, विलास नेरकर यांचेही मोबाइल स्वीच ऑफ येत होते.