चाळीसगावच्या सुशील अग्रवाल यांची राष्ट्रीय समितीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 01:28 PM2021-05-28T13:28:39+5:302021-05-28T13:30:37+5:30
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुशील नारायणदास अग्रवाल यांची स्थापत्य ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांची अखिल भारतीय संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान राष्ट्रीय समितीच्या सह अध्यक्ष पदी शुक्रवारी निवड करण्यात आली.
चाळीसगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुशील नारायणदास अग्रवाल यांची स्थापत्य ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांची अखिल भारतीय संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान राष्ट्रीय समितीच्या सह अध्यक्ष पदी शुक्रवारी निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी असणार आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही १९४१ मध्ये स्थापन झालेली, भारतीय बांधकाम उद्योगाची शिखर संस्था आहे. २०,००० बांधकाम कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत. देशभरात संस्थेच्या १८० शाखा आहेत. बीएआय बांधकाम उद्योग व सरकार यांच्यामध्ये धोरणात्मक बाबींमधील दुवा म्हणून ही संस्था काम करते आणि देशाच्या आर्थिक विकासास हातभार लावते.
यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान समीती देशातील सर्व सदस्यासाठी बांधकाम क्षेत्रात आवश्यक यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर व्याख्याने आयोजित करून मार्गदर्शन करते. सुशील अग्रवाल यांनी मागील वर्षभरात देशभरात अपेक्षित प्रभावी कार्य केल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे.
सुशील अग्रवाल यांना नुकताच वर्ष २०२०-२१ करिता , रोटरी इंटरनॅशनल प्रांत ३०३० द्वारे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड त्यांच्या बांधकाम , कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्रातील दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रांतपाल शब्बीर शाकिर यांच्या हस्ते देण्यात आला. भावी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवला यांनी त्यांच्या पुरस्काराची घोषणा केली.ससमाजातील विविध घटकांनी सुशील अग्रवाल यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्तुत्य निवड व रोटरी इंटरनॅशनल द्वारा पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.