सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:15 PM2022-11-04T21:15:21+5:302022-11-04T21:18:02+5:30
मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता.
जळगाव:शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला. यानंतर डॉक्टर त्यांच्या हॉटेलमध्ये दाखल झाले आणि सुषमा अंधारे यांची तपासणी केली. स्वत: अंधारे यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज मुक्ताईनगरमध्ये सभा आयोजित केली होती. पण, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी ऑनलाइन सभा घेण्याचे ठरवले. पण, सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शरीराची शुगर लेव्हल अचानक कमी झाल्याने त्यांनी ऑनलाइन सभा रद्द केली.
सुषमा अंधारेंच्या गाडीला पोलिसांचा गराडा
सुषमा अंधारेंच्या सभेमुळे जळगावातील मुक्ताईनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी सभेला परवानगी नाकरल्यानंतरही अंधारे सभास्थाळाकडे निघाल्या होत्या. पण, के प्राईड हॉटेलमधून सभास्थळी जाण्यास निघाल्या असता, शेकडो पोलिसांनी त्यांच्या गाडीला वेढा देऊन रोखले. यावेळी सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या. 'मी दहशतवादी आहे की गुंड? माझा नेमका गुन्हा काय आहे?' अशी विचारणा त्यांनी केली.
सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून पाठवलेले पार्सल
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ही महाप्रबोधन यात्रा नव्हे तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी यात्रा आहे. हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. उरली सुरली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुषमा अंधारे यांना पाठवले आहे, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले.