भेसळीच्या संशयावरून अडीच हजार किलो खाद्य तेलाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:45 PM2019-10-19T12:45:23+5:302019-10-19T12:45:47+5:30

तेल, तूप, मिठाई, बेसनाचे ५२ नमुने घेतले

Suspect of adulteration seizes two and a half thousand kg of edible oil reserves | भेसळीच्या संशयावरून अडीच हजार किलो खाद्य तेलाचा साठा जप्त

भेसळीच्या संशयावरून अडीच हजार किलो खाद्य तेलाचा साठा जप्त

Next

जळगाव : खाद्य तेलातील भेसळीच्या संशयावरून जिल्ह्यात तीन ठिकाणाहून अडीच हजार किलो खाद्य तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तेलाची अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. या सोबतच जिल्ह्यात ६४ ठिकाणी तपासण्या करून ५२ ठिकाणी खाद्यतेल, तूप, मिठाई, बेसन पीठाचे नमुने घेण्यात आले आहेत.
सणासुदीच्या दिवसामध्ये मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने त्यामध्ये भेसळीची शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात गुरुवारी जळगाव बसस्थानकावर ४५० किलो खवा जप्त केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये जळगाव शहरात एका घाऊक विक्रेत्याकडे तसेच नशिराबाद येथे शेंगदाणा तेल आणि पाळधी, ता. धरणगाव येथे पामतेलाचा एकूण अडीच हजार किलो साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात ६४ ठिकाणी तपासणी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल विक्रेते, किरकोळ विक्रेते अशा एकूण ६४ ठिकाणी जिल्ह्यात तपासणी करण्यात आली. त्यात खाद्य तेल, तूप, मिठाई व बेसनाचे ५२ नमुने घेण्यात आले. या सर्व कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्क आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील व सहकाऱ्यांनी केल्या.

दिवाळी सणामध्ये खाद्य पदार्थात भेसळीची शक्यता असते. त्यामुळे शिळे, स्वस्त दरातील, रंगीत हलक्या दर्जाची मिठाई घेणे टाळण्यासह खवा व इतर अन्न पदार्थ घेताना त्यांची समूह क्रमांक व उत्पादन तिथी तपासूनच खरेदी करावे व आरोग्याची काळजी घ्यावी. भेसळीबाबत संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधावा.
- वाय.के. बेंडकुळे, सहाय्क आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: Suspect of adulteration seizes two and a half thousand kg of edible oil reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव