पोलीस कोठडीतील संशयित आरोपीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:22 PM2017-11-06T15:22:42+5:302017-11-06T15:24:07+5:30
कापूस चोरीच्या गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संतोष बंडू भील (वय ४८ रा.वराड, ता.धरणगाव) या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली. वराड गावातील चार जणांनी संतोष याला बेदम मारहाण केली होती, त्यानंतर पोलिसांनीही अटक केल्यानंतर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन या सर्वांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. दरम्यान, संतोष याच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. हा गुन्हा सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि ६ : कापूस चोरीच्या गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या संतोष बंडू भील (वय ४८ रा.वराड, ता.धरणगाव) या संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली. वराड गावातील चार जणांनी संतोष याला बेदम मारहाण केली होती, त्यानंतर पोलिसांनीही अटक केल्यानंतर मारहाण केली, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन या सर्वांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. दरम्यान, संतोष याच्या मृत्यूमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. हा गुन्हा सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका शेतातून संतोष भील याने कापूस चोरल्याच्या संशयावरुन २७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता वराड गावाजवळ महामार्गावर गावातील चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुध्द पडला. हा प्रकार समजल्यानंतर संतोषचा पुतण्या अनिल सोनवणे व संजय बागुल हे घटनास्थळी गेले असता तेथे २० ते २५ जण होते तर संतोष बेशुध्द पडलेला होता. सोनवणे व बागुल यांनी त्याला धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तीन दिवस उपचार केल्यानंतर संतोष याची सुटका झाली होती.
२८ रोजी गुन्हा दाखल ३ रोजी अटक
कापूस चोरीप्रकरणी संतोष याच्याविरुध्द २८ आॅक्टोबर रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी संतोष याला धरणगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्याने चोरलेला १०० किलो कापूस काढून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस कोठडीत असताना खालावली तब्येत
४ नोव्हेंबर रोजी तब्येत खालावल्याने संतोष याला पोलिसांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक खालावल्याने त्याला ५ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजता जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाला.