भेसळीचा संशय, यावल येथून ‘एफडीआय’ने घेतले दुधाचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:20 PM2020-02-29T12:20:34+5:302020-02-29T12:21:12+5:30
गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले नमुने
जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्यावतीने जिल्ह्यात दूध गुणवत्ता तपासणी मोहीम हाती घेतली असून यामध्ये शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी यावल येथील डेअरी व आईस्क्रीम पार्लरमधून विभागाने दुधाचे नमुने घेतले. गुणवत्ता तपासणीसाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात दुधाच्या गुणवत्तेविषयी तक्रारी येऊ लागल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्यावतीने तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून विभागाच्यावतीने डेअरी व दूध विक्री आस्थापनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळी यावल येथील एक डेअरी व आईस्क्रीम पार्लर तसेच दुसऱ्या एका डेअरीची चौकशी केली. त्या वेळी तेथे विक्रीसाठी असलेल्या दुधाच्या गुणवत्ता तपासणीसाठी म्हैस, गाय यांच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.
हे नमुने अन्न चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, नमुना सहायक चंद्रकांत सोनवणे यांनी केली.