पिलखोड येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:10 PM2019-11-26T22:10:56+5:302019-11-26T22:11:08+5:30
शेतीसाठी तीन सासरच्यांनी मागितले तीन लाख : खून केल्याचा आरोप
जळगाव : तालुक्यातील पिलखेडा येथील रोहीणी महेंद्र कोळी (२३) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासरच्यांचे म्हणणे आहे तर माहेरच्या लोकांनी हा खून असल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता घटना उघडकीस आली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती घेण्यासाठी माहेरहुन तीन लाख रुपये आणावेत यासाठी गेल्या महिनाभरापासून पती महेंद्रसह सासूकडून रोहिणीचा छळ सुरू होता. दिवाळीला घरी आल्यानंतर रोहिणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबियांनी पैसे देण्यास नकार दिला होता. तेंव्हापासून सासरचे मारहाण करुन रोहिणीचा शारिरीक तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप रोहिणीचे वडील अशोक बळीराम तायडे (रा.पुरी गोलवाडे,ता. रावेर ) यांनी केला आहे.
गळफास देवून सासरच्यांचे पलायन
दोन दिवसांपूर्वी मोठी बहिण शिला सचिन सोनवणे हिस रोहिणीने फोनवरुन सासु, पतीकडून होणाऱ्या छळाबद्दल सांगितले होते. समजूत काढण्यासाठी सोमवारी रोहिणीची आई देखील तीच्या सासरी गेली होती. सासुने त्यांना घरात घेतले नव्हते. मंगळवारी नेमकी गावकऱ्यांकडून रोहिणीच्या गळफासाबाबत बातमी कळाली, असेही तायडे यांनी सांगितले. आत्महत्या नव्हे तर छळातून सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिला गळफास देऊन त्यांनी घरातून पलायन केले,असेही ते म्हणाले.
दरम्यान, रोहिणीच्या पश्चात पती, सासु व दीड वर्षांची मुलगी आराध्या असा परिवार आहे. या घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कदीर तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.