जळगावात दुचाकी विक्री दालनाचा आरटीओंकडून व्यवसाय परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:20 PM2017-10-22T23:20:30+5:302017-10-22T23:20:43+5:30
विक्री केलेल्या वाहनांची वेळेत नोंदणी नाही
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 22- विना नोंदणी वाहन खरेदीदारास देणे, शासकीय रकमेचा भरणा वेळेवर न करणे आणि नवीन वाहन नोंदणी संबंधित कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर न करणे आदी कारणांमुळे शहरातील प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि. या वाहन वितरक एजन्सीचा व्यवसाय परवाना उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांनी निलंबित केला.
वाहन नोंदणीच्या नियम 47 नुसार नवीन वाहनांची नोंदणी विक्री केल्यानंतर 7 दिवसाच्या आत होणे आवश्यक आहे. वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर वाहन नोंदणीसाठी आरटीओतर्फे प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा.लि.ला स्वतंत्र युझर आयडी तयार करुन देण्यात आलेला आहे. वारंवार सूचना देऊनही संबंधित एजन्सीकडून नियमांचे पालन झालेले नाही. विना नोंदणी वाहने खरेदीदारांच्या ताब्यात देऊन केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे नियम 42 चे उल्लंघन केले. शिवाय 268 प्रकरणात ग्राहकांकडून शासनास भरावयाची रक्कम वसूल करण्यात आली व तिचा भरणा आरटीओ कार्यालयात झालेला नाही, असे नोटीसमध्ये म्हटले होते.
असे आहेत प्रलंबित प्रकरणे
नोंदणी व कर शुल्कचे 56 प्रकरणे, वाहन तपासणीचे 268, नोंदणी क्रमांक अॅप्रुव्हलचे 125 असे एकुण 449 प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच सरकारच्या रकमेचाही वापर केला जात असल्याने 90 दिवसासाठी व्यवसाय परवाना निलंबित का करु नये अशी नोटीस आरटीओकडून बजावण्यात आली होती. मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिला होता. त्यानुसार वेळेत उत्तर न दिल्याने व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्यात आला आहे.
प्रभंजन ऑटोमोबाईल्सच्या व्यवसाय परवाना निलंबनाच्या कारवाई विरोधात पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अपील केले असल्याचे प्रभंजन ऑटोमोबाईल्सचे संचालक आदित्य झाखेटे यांनी सांगितले. आपण सर्व पूर्तता केली असल्याचाही दावा त्यांनी केला. परवाना किती दिवसासाठी निलंबित केला आहे, हेदेखील स्पष्ट नसल्याचे जाखेटे यांचे म्हणणे आहे.