निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले साडे सोळा महिन्यांनी शरण
By विजय.सैतवाल | Published: January 15, 2024 09:48 PM2024-01-15T21:48:46+5:302024-01-15T21:50:30+5:30
गुन्हा दाखल झाल्यापासून होते पसार, दोन दिवसांची पोलीस कोठडी.
जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर साडे सोळा महिन्यांनी सोमवार, १५ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आले. त्यांना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, बकाले यांना अटक करण्यात आल्याचे व त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजताच मराठा समाज बांधव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी न्यायालय परिसरात जमा झाले होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्तदेखल तैनात करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक पदावर असताना बकाले यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहायक फौजदाराशी मोबाईलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची ऑडीओ क्लीप समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर मोठा रोष व्यक्त करण्यात आला. यात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात मोठे आंदोलनदेखील झाले. गुन्हा दाखल झाल्यापासून ते पसार होते. अखेर बकाले सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे हजर झाले. त्यांना ११ वाजता अटक करण्यात आले. त्यानंतर पोलिस कोठडीच्या मागणीसाठी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. केळकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रिया मेढे यांनी तर बकालेतफे ॲड. सूरज जहांगिर यांनी काम पाहिले. तर हरकतदारांतर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी युक्तीवाद केला.