मारहाण प्रकरणी `त्या` चालकावर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:36+5:302021-06-16T04:21:36+5:30
जळगाव : ड्युटी लावण्यावरून सोमवारी जळगाव आगारात वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी व चालक तथा कॉस्ट्राईब कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव ...
जळगाव : ड्युटी लावण्यावरून सोमवारी जळगाव आगारात वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी व चालक तथा कॉस्ट्राईब कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नवरे यांच्यात वाद होऊन, तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नन्नरे यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर मंगळवारी आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी नन्नवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
शैलेश नन्नवरे यांनी संतापात तिवारी यांना आर.डी.कोळी या वाहकाला`स्पेअर`भरून का देत नाही. असा जाब विचारून जळगाव आगाराचे वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांना शिवीगाळ व धमकी देत मारहाण केली होती. या प्रकरणी नन्नवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर नन्नवरे यांनीदेखील आपणास तिवारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेत नन्नवरे यांना दोषी धरून आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी निलंबित केले आहे.
इन्फो :
विभाग नियंत्रकांकडून चौकशीचे आदेश
या घटने प्रकरणी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी प्रज्ञेश बोरसे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्याही सुचना केल्या आहेत. तर या घटने प्रकरणी लवकरच विभाग नियंत्रकांकडे अहवाल सादर करणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.