शिकवणी घेताना आढळल्यास निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:14 PM2019-08-14T12:14:40+5:302019-08-14T12:15:39+5:30
शिक्षकांवर होणार कारवाई : १७ भरारी पथके नियुक्त
जळगाव : अनुदानित, अंशत: अनुदानित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक जर खासगी शिकवणी किंवा खासगी क्लासेसमध्ये शिकवितांना आढळल्यास निलंबन केले जाईल अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांनी दिली़ यासाठी खासगी शिकविणी रोखण्यासाठी १७ भरारी पथकांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली़
जिल्हाभरात अनेक शिक्षक खासगी क्लासेस घेतात, याबाबत अनेक पालकांच्या तक्रारी आल्या होत्या़ क्लासेस लावणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी व अन्य विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक मिळत असल्याच्याही तक्रारी होत्या़ याचा शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर पर्यायाने शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम होत होता़ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाभरात धाडसत्र
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तिघांचा या पथकात समावेश असेल़ ही पथके जिल्हाभरात धाडी टाकणार आहे़ असे शिक्षक आढळल्यास त्यांचा अहवाल मुख्याध्यापकांकडे देऊन मुख्याध्यापकांना त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे़ यात निलंबनापर्यतही कारवाई होऊ शकते, असेही शिक्षणाधिकाºयांनी सांगितले़