जळगावात कारागृहातील कैदी पलायनप्रकरणी दोन कर्मचारी निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:36 PM2018-12-07T12:36:47+5:302018-12-07T12:37:50+5:30
उपमहानिरीक्षकांची कारवाई
जळगाव : येथील कारागृहातून दोन कैदी पसार झाल्याने भिशी अमलदार बाळू उत्तम बोरसे व रात्री पाळीचे अमलदार वासुदेव हिरामण सोनवणे या दोघांना कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन काळात बोरसे याचे मुख्यालय नाशिक तर सोनवणे याचे जालना देण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींनी पलायन केल्याने या कारागृहाची लवकरच उंची वाढविण्यात येईल व सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यिात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्राथमिक चौकशीत भिशी अमलदार बाळू बोरसे व सोनवणे दोषी आहेत. या प्रकरणाची दक्षता पथकामार्फत विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. आणखी जो दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा. बिलवाडी, ता. जामनेर) व रवींद्र भिमा मोरे (वय २९, रा. बोदवड) या दोन्ही कैद्यांना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या कामासाठी बराकमधून बाहेर काढण्यात आले होते. कारागृह रक्षकाची नजर चुकवून हे दोघेही पसार झाले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात आले होते. चौकशीनंतर त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
दोन वर्षांच्या कालावधीत दोन वेळा आरोपी पलायनाच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाशी चर्चा करुन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. कारागृहात काही उपायोजना करण्याच्याही सूचना देसाई यांनी दिल्या.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
बाळू बोरसे यांच्यावर ११ कैद्यांची जबाबदारी असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. देसाई यांनी कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले. दक्षता पथकाने चौकशी करताना कारागृहातील इतर आरोपींना या प्रकाराची माहिती होती का?, कारागृह प्रशासन कुठे कमी पडले याचीही माहिती जाणून घेतली. दक्षता पथकाकडून चौकशी अहवाल महानिरीक्षकांना सादर केला जाणार आहे.
अंतर्गत गटबाजीची घेतली दखल
कारागृहात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा मुद्दा छेडला असता, देसाई म्हणाले या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. त्याचे परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येतील. या गटबाजीचा परिणाम आरोपींवर देखील होत आहे. अनेक अधिकाºयांच्या तक्रारी आहेत. त्याचे पुरावे देखील आपल्याकडे आलेले आहेत, असेही देसाई यांनी मान्य केले. दुपारपर्यंत चौकशी करुन देसाई औरंगाबाद येथे रवाना झाले.
दोन पथके रवाना
कारागृहातून दोन आरोपी पलायन झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांचे दोन स्वतंत्र पथके रवाना झाली आहेत. गुरुवारी अमळनेर पोलिसांच्या तावडीतूनही गुन्हेगाराने पलायन केल्याने त्याच्याही शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले.
अधीक्षकासह इतर पदे वाढविण्यावर भर
कारागृह अधीक्षक डी.टी. डाबेराव यांच्या निलंबनानंतर कारागृहाचे अधीक्षक पद रिक्त आहे. प्रभारीवरच कामकाज केले जात आहे. त्यामुळे आता सर्वात आधी अधीक्षकाचे पद भरले जाणार असून शिपाई संवर्गातील पदे वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. जळगाव कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची आहे. परंतु, सद्यस्थितीत येथे ४५० कैदी आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान ८० शिपाई हवेत, प्रत्यक्षात आज ४० रक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यावर प्रचंड भार येत आहे, असेही योगेश देसाई म्हणाले. औरंगाबाद विभागात १४ कारागृह आहेत. नवीन शंभर पदे भरुन त्यांचे नियोजन करुन कर्मचारी वाटप केले जाणार आहे.